
मुंबई, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। पर्प्लेक्सिटी या एआय स्टार्टअपने अँड्रॉइडसाठी आपलं बहुप्रतिक्षित एआय नेटिव्ह ‘कॉमेट’ ब्राउझर अधिकृतपणे लाँच केलं आहे. वेब ब्राउझिंगदरम्यान थेट एआय सहाय्य मिळवून देणारं हे ब्राउझर वापरकर्त्यांना व्हॉईस इनपुट, अनेक टॅबचा एकत्रित सारांश, संदर्भानुसार त्वरित उत्तर आणि स्वयंचलित कृती करण्याची सुविधा देते. यामुळे मोबाइलवरच शक्तिशाली एआय अनुभव मिळणार असून अँड्रॉइड युजर्सना आता ब्राउझिंगमध्येच पर्प्लेक्सिटीचा स्मार्ट असिस्टंट वापरता येणार आहे.
कॉमेट हे जगातील पहिल्या एआय नेटिव्ह मोबाईल ब्राउझरपैकी एक मानलं जात आहे. सध्या ओपन एआयचे अॅटलस ब्राउझर फक्त मॅकओएसवर उपलब्ध असून विंडोज आणि मोबाईल आवृत्त्या विकसित होत आहेत. याउलट पर्प्लेक्सिटीनं जुलै महिन्यात डेस्कटॉपवर Max सबस्क्रायबर्ससाठी कॉमेट सुरू केलं, त्यानंतर सर्वांसाठी उपलब्ध केलं आणि आता अँड्रॉइडवरही ते आणलं आहे. कंपनीनं आयओएस आवृत्तीही लवकरच येईल असं जाहीर केलं, मात्र तारीख अद्याप सांगितलेली नाही.
अँड्रॉइडवरील कॉमेटमध्ये थेट वेबपेजवर एआय सहाय्य उपलब्ध असून वापरकर्ते प्रश्न विचारू शकतात, सारांश मिळवू शकतात किंवा एखादं कार्य सुरू करण्यास सांगू शकतात. व्हॉईस मोडमुळे बोलून माहिती शोधणे आणि टॅबमधून कंटेंट गोळा करणे सोपं होतं. एकाच वेळी अनेक टॅबचा मजकूर एकत्र करून सारांश देण्याची क्रॉस-टॅब सारांश सुविधा यात जोडली आहे. बिल्ट-इन अॅड ब्लॉकरमुळे स्वच्छ आणि सुरक्षित ब्राउझिंग अनुभव मिळणार आहे. एआय संदर्भानुसार थेट पानावर उत्तर देत असल्याने वेगळ्या अॅपमध्ये जाण्याची गरज राहत नाही.
सध्या डेस्कटॉप आणि मोबाईलमधील बुकमार्क्स व ब्राउझिंग हिस्ट्री सिंक उपलब्ध नाही, मात्र पुढील काही आठवड्यांत ही सुविधा येईल, असं पर्प्लेक्सिटीच्या प्रवक्त्या बीजोली शाह यांनी सांगितलं. अधिक प्रगत एजंटिक व्हॉईस मोड आणि बिल्ट-इन पासवर्ड मॅनेजरही लवकरच जोडला जाणार असून तोपर्यंत अँड्रॉइडचं डिफॉल्ट मॅनेजर वापरता येईल.
पर्प्लेक्सिटी कॉमेटला “एजेंटिक सर्चसाठीचं ब्राउझर” म्हणून वर्णन करते. यात फक्त कीवर्ड शोधण्याऐवजी एआय वापरकर्त्याचा हेतू ओळखतो, विविध स्त्रोतांकडून माहिती गोळा करतो आणि अनेक क्रिया आपोआप पूर्ण करतो. कमी इनपुटमध्ये अधिक कार्यक्षम परिणाम देण्याची क्षमता ही याची मोठी ताकद मानली जाते. अँड्रॉइड युजर्स आता प्ले स्टोअरवरून कॉमेट डाउनलोड करू शकतात आणि एआय -आधारित ब्राउझिंगच्या नव्या युगाची सुरुवात अनुभवू शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule