
आज संपूर्ण समाजाला हादरवून सोडणारी आणि मानवी संवेदनांना प्रश्न विचारणारी सर्वात गंभीर घटना म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या आत्महत्या. शाळेतील मुलांच्या हातात पेन, वही, स्वप्नं आणि भविष्य असावं; पण त्यांच्या हातात दोरी, ब्लेड किंवा आत्महत्येचे मार्ग येऊ लागले, ही केवळ व्यक्तिगत समस्या राहिलेली नाही, तर ती आपल्या शिक्षण पद्धतीचा, कुटुंबीय संस्कारांचा, डिजिटल युगातील स्पर्धेचा आणि समाजाच्या यंत्रणेचा परिणाम आहे. अलीकडे घडलेल्या अनेक आत्महत्यांच्या घटना, विशेषतः दिल्ली, पुणे, कोटा, वर्धा आणि इतर भागातील विद्यार्थ्यांच्या मृत्यूने संपूर्ण समाजाच्या मनावर प्रश्न निर्माण केला आहे की अखेर एवढं काय घडलं की एक निष्पाप विद्यार्थी स्वतःचं जीवन संपवण्याचा निर्णय घेतो? समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास विद्यार्थी आत्महत्या ही वैयक्तिक कमजोरी नसून सामाजिक दाब, सांस्कृतिक अपेक्षा, कौटुंबिक वातावरण, शालेय मूल्यांकन पद्धती आणि मानसिक आरोग्याविषयी असलेल्या अज्ञानाची संयुक्त निर्मिती आहे.
आजच्या कुटुंब रचनांमध्ये मुलांची संख्या कमी झाल्याने “एकुलता एक” किंवा “लाडका-लाडकी” संस्कृती वाढली आहे. पालकांच्या नजरेत मुलं आता ‘निर्माण करायचे चारित्र्य’ नसून ‘गुंतवणुकीवर मिळणारा परतावा’ झाली आहेत. जेथे पालक स्वतःच्या अपूर्ण आकांक्षा, सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक स्पर्धा मुलांच्या शिक्षणावर लादतात. त्यामुळे मुलांवर अपेक्षांचे ओझे वाढते. अनेक मुलांमध्ये ताण सहन करण्याची कौशल्ये विकसितच होत नाहीत. पूर्वीच्या संयुक्त कुटुंबात भावंडे, आजी-आजोबा, खेळ, शिक्षा, शिस्त आणि संवाद होते; आज मात्र घरात शांतता आहे पण मनांत आवाज आहेत, मोबाईल आहे पण संवाद नाही, महागडी शाळा आहेत पण भावनिक शिक्षण नाही. शिक्षा किंवा मर्यादा लावणे आता ‘मानसिक हिंसा’ समजली जाते आणि मुलांना अपयश किंवा नकार स्वीकारण्याची मानसिक सवयच राहत नाही.
अलीकडच्या काळात शालेय विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनकपणे वाढताना दिसत आहे. शाळा म्हणजे ज्ञान, शिस्त, समविचारांची देवाणघेवाण आणि भविष्याचे घडते पाऊल असे आपण मानतो; परंतु जेव्हा हीच शाळा, हा शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांसाठी जिवाभावाचा भार बनतो, तेव्हा समाजाची मूल्यव्यवस्था किती बदलली आहे हे प्रकर्षाने जाणवते. आत्महत्या ही केवळ वैयक्तिक निर्णय नसतो; तो एक सामाजिक संदेश असतो की कुठेतरी काही चुकले आहे, आणि गंभीरपणे चुकत आहे. शालेय वयातील विद्यार्थ्यांनी आत्महत्या करणे हे सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक आणि मानसिक आरोग्याच्या घटकांचे गुंतागुंतीचे मिश्रण आहे. समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून ही समस्या पाहिली तर या घटना केवळ काही दुःखद किस्से नाहीत, तर वाढत्या सामाजिक दडपणाचे प्रतिबिंब आहेत.
आजचा विद्यार्थी कट्टर स्पर्धेच्या जगात जगत आहे. शाळा म्हणजे फक्त वर्ग, पुस्तके आणि परीक्षा नव्हे; ती स्पर्धेची रणभूमी झाली आहे जिथे पहिले येणारेच “यशस्वी” मानले जातात, बाकी सर्व “हरलेले” ठरविले जातात. विद्यार्थ्यांच्या भावनिक जगण्यापेक्षा त्यांच्या गुणपत्रिकेला अधिक प्रतिष्ठा दिली जाऊ लागली आहे. शिक्षकांची अपेक्षा, पालकांचे स्वप्न आणि समाजाचे मूल्यांकन या तिपेडी दडपणाखाली विद्यार्थी स्वतःचा वेगळा आवाज हरवून बसतात. मानसिक आरोग्याला अजूनही “नाजूकपणा” समजले जाते आणि मुलांवर होणारा भावनिक ताण अदृश्य राहतो. अशा परिस्थितीत जेव्हा विद्यार्थी मोठ्या भावनिक आव्हानांशी झुंजतात, तेव्हा त्यांना आधार, संवाद किंवा समजून घेणारा हात मिळत नाही आणि ते मौनात तुटू लागतात.
कुटुंबव्यवस्था या समस्येत निर्णायक भूमिका बजावते. अणुकुटुंबामुळे संवाद आणि भावनिक सहजीवन कमी झाले आहे. पालकांच्या नोकऱ्या, व्यस्त दिनक्रम आणि तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेले दैनंदिन जीवन मुलांशी असणाऱ्या संवादाला बाधित करत आहे. अनेकवेळा मुलांचे “मी ठीक नाही”, “मला भीती वाटते”, “मला जमत नाही” हे संकेत पालकांच्या लक्षातही येत नाहीत. दुसरीकडे एकुलता एक किंवा कमी अपत्य असलेल्या कुटुंबांमध्ये मुलांवर अतिप्रेम, अतीसंरक्षण आणि त्याचबरोबर अवास्तव अपेक्षा यांचे अनोखे मिश्रण तयार झाले आहे. परिणामी, मुलांनी चुका करणे किंवा अपयश स्वीकारणे अशक्य झाले आहे. “तू कसं नाही करू शकत?”, “इतर मुलं करू शकतात मग तू का नाही?” या प्रश्नांपेक्षा त्यांना हवं असतं ते तुला “काय त्रास होतोय? मी आहे ना.”
शाळांनी मुलांना फक्त ज्ञान देऊन चालणार नाही; त्यांना भावनिक स्थैर्य, ताणतणावांचं व्यवस्थापन, आत्मस्वीकृती आणि जीवनकौशल्ये शिकवणे अधिक आवश्यक आहे. परंतु शिक्षण पद्धतीत परीक्षांच्या, रँकिंगच्या आणि कामगिरीच्या आकड्यांना अधिक महत्त्व देण्यात येते. इथे विद्यार्थ्यांचे मानसिक जग समजून घेणारी, त्यांची भीती कमी करणारी आणि त्यांना मानवी मूल्ये शिकवणारी प्रणाली अद्याप रुजली नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातेसंबंधही यांत्रिक झाले आहेत ते म्हणजे नाव, चेहरा आणि रोल नंबर एवढ्यापुरतेच. शालेय परिसरातील छळवाद, टोमणे, अपमान आणि शिक्षकांकडून होणारा ताण व ओरडणी हे अनेक विद्यार्थ्यांसाठी असह्य वास्तव बनते.
समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून जर या घटनांचा विचार केला, तर एमिल दुर्खाइमच्या ‘अनोळखी आत्महत्या’ (Anomic Suicide) या संकल्पनेशी त्यांची तुलना करता येते. जेव्हा समाजातील मूल्यव्यवस्थेत अचानक बदल होतात आणि व्यक्तीला त्यांच्याशी जुळवून घेता येत नाही, तेव्हा आत्महत्येचे प्रमाण वाढते. आजचा समाज यश, पैसा, स्पर्धा आणि प्रतिष्ठा या चार स्तंभांवर उभा आहे, जिथे करुणा, संवाद, शांतता, संवेदनशीलता आणि स्वीकार यांना कमी जागा मिळते. सोशल मीडियामुळे तुलना, अपूर्णतेची भावना, लोकप्रियता आणि इतरांसारखे होण्याची जबरदस्त इच्छा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम करत आहे. तंत्रज्ञानाने जग जवळ आणले पण हृदये दूर नेली आहेत.
ही परिस्थिती बदलण्यासाठी कुटुंब, शाळा, समाज आणि शासन यांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थ्यांना आत्महत्या हा मार्ग नसून त्यांच्यासाठी मदत उपलब्ध आहे, अशी जाणीव निर्माण होणे अत्यावश्यक आहे. शाळांमध्ये काउन्सेलिंग केंद्रे, मानसिक आरोग्य तज्ञ, हेल्पलाईन, ओपन कन्वर्सेशन तास, सहानुभूतीवर आधारित शिक्षण आणि ताण व्यवस्थापनाचे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. पालकांना मुलांशी भावनिक नातेसंबंध बांधण्याचे प्रशिक्षण देणे तितकेच महत्त्वाचे आहे. समाजाने गुणांवर आधारित मुलांचे मूल्यांकन करणे थांबवून त्यांची मूल्ये, आवडी, कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व ओळखण्याची गरज आहे.
शेवटी, प्रत्येक बालक हे अपूर्ण, वाढणारे, शिकणारे आणि चुका करणारे अस्तित्व आहे, विद्यार्थी हे प्रकल्प नसतात, ते जगणारे जीव असतात. आत्महत्येने संपणारी मुलांची स्वप्ने ही केवळ त्या मुलाची हानी नसून संपूर्ण समाजाच्या संवेदनशीलतेचा मृत्यू आहे. आज आपण मुलांना शिकवतो कसे जिंकायचे, स्पर्धा कशी करायची, पण जीवन जगायचे कसे हे शिकवायला आपण विसरलो आहोत. जोपर्यंत हा विसर दूर होत नाही, तोपर्यंत या घटनांची सावली आपल्या भविष्यातील पिढीवर अंधार बनून राहील. कारण प्रश्न अजूनही तोच आहे की विद्यार्थी अभ्यासासाठी दबावाखाली आहेत की जगण्यासाठी?
डॉ. राजेंद्र बगाटे, (समाजशास्त्राचे अभ्यासक) ९९६०१०३५८२
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी