
मुंबई, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। ऍपल आपल्या ग्राहकांसाठी कमी किंमतीत प्रीमियम अनुभव देणारी तीन नवी बजेट उपकरणं 2026 मध्ये बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या यादीत स्वस्त मॅकबुक, आयफोन 17ई आणि 12व्या पिढीचा आयपॅड यांचा समावेश राहणार आहे. ऍपलने प्रथमच बजेट सेगमेंटमध्ये मोठी पावलं उचलण्याचा निर्णय घेतल्याने विकसनशील बाजारपेठेत, विशेषतः भारतात, कंपनीची उपस्थिती अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.
नव्या एंट्री-लेव्हल मॅकबुकमध्ये A सिरीज चिपचा वापर ही सर्वात मोठी आणि लक्षवेधी घोषणा आहे. आतापर्यंत सर्व मॅकबुक मॉडेल्स M सिरीज चिपसेटवर चालत आले होते, परंतु या नवीन मॉडेलमध्ये आयफोन 16 प्रोमध्ये असलेली A18 Pro चिप वापरली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या लॅपटॉपला 16 इंच डिस्प्ले, 8GB रॅम आणि एकच USB-C पोर्ट मिळू शकतो. डिझाइनमध्ये जुनी तंत्रज्ञान रचना, तसेच रंग पर्यायांत सिल्व्हर, ब्लू, पिंक आणि यलो असे पर्याय उपलब्ध असतील. किंमत शक्य तितकी कमी ठेवण्यासाठी हा साधा आणि किफायतशीर दृष्टिकोन वापरला जाणार आहे.
स्मार्टफोन श्रेणीत आयफोन 17ई हा ऍपलचा सर्वात परवडणारा पर्याय ठरणार आहे. आयफोन 16ईच्या उत्तराधिकारी म्हणून येणाऱ्या या मॉडेलमध्ये 2026 मध्ये येणारी A19 चिप, 18 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि ऍपलचा स्वतःचा C1 5G मोडेम असणार आहे. हार्डवेअरमध्ये मोठे बाह्य बदल नसले तरी कार्यक्षमता आणि आंतरिक क्षमता वाढवण्यावर अधिक भर असल्याचं समजतं.
नवीन 12वा जनरेशन आयपॅडही या यादीत समाविष्ट असणार असून A18 प्रोसेसरमुळे पहिल्यांदाच एंट्री-लेव्हल आयपॅडवर Apple Intelligence (AI) फीचर्स उपलब्ध होतील. डिझाइन मात्र सध्याच्या 10व्या जनरेशन आयपॅड प्रमाणेच राहणार आहे.
तज्ज्ञांच्या मतानुसार, ही लॉन्चिंग ऍपलच्या मोठ्या धोरणात्मक रोडमॅपचा महत्त्वाचा भाग आहे. 2026 च्या दुसऱ्या सहामाहीत आयफोन 18 प्रो मालिका आणि पहिला फोल्डेबल आयफोन येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर 2027 च्या सुरुवातीला आयफोन 18, आयफोन 18ई आणि आयफोन एअर बाजारात दाखल होऊ शकतात. स्वस्त उपकरणांच्या या मालिकेमुळे ऍपलला भारतासह विकसित होणाऱ्या बाजारपेठांमध्ये आपला हिस्सा मोठ्या प्रमाणात वाढवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule