
कोल्हापूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।
संपूर्ण राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आज सुरू असताना या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा कोल्हापुर जिल्ह्यात पर्दाफाश करण्यात आला. मुरगुड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने काही शिक्षक परीक्षार्थीसह टोळीतील नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.
आज राज्यभरामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लाखो परीक्षार्थी शिक्षक परीक्षा देत आहेत. अनेक केंदावर ही परीक्षा अत्यंत सुरळीतपणे सुरू होती, कोल्हापूर जिल्ह्यात मात्र हा या परीक्षेचा पेपरच फोडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात गोंधळ उडाला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपीमध्ये काही शाळेतील परीक्षार्थी शिक्षक सहभागी आहेत. सर्व आरोपी कागल तालुक्यातील सोनगे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये सर्व आरोपी कागल आणि राधानगरी तालुक्यातील आहेत.काल सायंकाळी कोल्हापूर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. यानंतर रात्रभर पोलीस या घटनेचा तपास सुरु केला. काही जणांची नावे निष्पन्न झाल्यानंतर त्यांचा शोध घेऊन सोनगे गावातून 9 जणांना ताब्यात घेतले. अजूनही संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केलं आहे. परीक्षेसाठी उमेदवारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. टीईटी परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण चार लाख 75 हजार 668 उमेदवारांनी अर्ज केला आहे. यामध्ये मराठी माध्यमाचे उमेदवार सर्वाधिक आहेत. मराठीसाठी तीन लाख 27 हजार 135, इंग्लिशमधून 28 हजार 437, उर्दू 25 हजार 935, हिंदी 92 हजार 420, बंगाली माध्यमातून 168, कन्नड 1468, तेलगू 30, गुजराथी 75 आणि सिंधी माध्यमातून केवळ एका उमेदवाराने नोंदणी केली आहे. तसेच राज्यातून 5283 दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेला नोंदणी केली असून यातील 411 दिव्यांग उमेदवारांना लेखनिक पुरविण्यात आला आहे. माजी सैनिक असलेले 45 उमेदवार परीक्षा देणार आहेत. परीक्षेनंतर 45 दिवसात टीईटीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा सर्वाधिक नोंदणी पुणे, नाशिक आणि नांदेड या जिल्ह्यांतून झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar