
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर (हिं.स.)कोलकाता कसोटीत दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून बाहेर पडलेला भारतीय कर्णधार शुभमन गिल एकदिवसीय मालिकेतही खेळण्याची शक्यता कमी आहे. दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना सध्या गुवाहाटी येथे खेळला जात आहे आणि गिल त्याचा भाग नाही. ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्यापैकी एकाला कर्णधारपदाची धुरा देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
गिलची दुखापत केवळ मानेच्या दुखापतीपुरती मर्यादित नाही. त्याला बराच विश्रांतीची आवश्यकता असेल आणि म्हणूनच, भारतीय संघ व्यवस्थापन त्याला लवकरच खेळात परतण्याचा धोका पत्करू इच्छित नाही. तो सध्या मुंबईत आहे आणि त्याच्या दुखापतीची तीव्रता निश्चित करण्यासाठी एमआरआयसह वैद्यकीय चाचण्या घेत आहे. त्याला अधिक विश्रांतीची आवश्यकता आहे हे निश्चित करण्यासाठी सर्व चाचण्या घेतल्या जात आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबरपासून सुरू होईल. पहिला सामना रांचीमध्ये खेळला जाईल, तर दोन्ही संघ ३ डिसेंबर रोजी दुसऱ्या सामन्यात एकमेकांसमोर येतील. मालिकेचा शेवटचा सामना ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणममध्ये खेळला जाणार आहे.
यशस्वी जयस्वालला रोहित शर्मासोबत सलामीची संधी मिळू शकते. अभिषेक शर्माची राखीव सलामीवीर म्हणून निवड होऊ शकते. गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्याकडे सोपवण्यात येऊ शकते, तर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर बुमराहला विश्रांती मिळण्याची अपेक्षा आहे. आकाश दीप देखील स्पर्धेत आहे. बीसीसीआय या मालिकेसाठी अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकी त्रिकुटावर अवलंबून राहू शकते.
गुवाहाटी कसोटीतून संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतवर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. जर गिल एकदिवसीय मालिकेसाठीही अनुपलब्ध राहिला तर यष्टीरक्षक-फलंदाज पंतला कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते असे मानले जाते. गेल्या वर्षभरात पंतने फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला असल्याने केएल राहुलचे नावही या शर्यतीत पुढे येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे