दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी केएल राहुल भारताचे नेतृत्व करणार
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर, (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. कोलकाता कसोटीत दुखापत झालेल्या कर्णधार शुभमन गिलला आगामी एकदिवसीय मालिकेतून
के एल राहुल


नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर, (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. कोलकाता कसोटीत दुखापत झालेल्या कर्णधार शुभमन गिलला आगामी एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी केएल राहुल कर्णधार असेल तर ऋषभ पंत उपकर्णधार असेल.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे अनुभवी क्रिकेटपटू असतील. कोलकाता कसोटीदरम्यान गिलच्या मानेला दुखापत झाली होती आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गिल सध्या मुंबईत आहे आणि वैद्यकीय देखरेखीखाली आहे. श्रेयस देखील या मालिकेचा भाग असणार नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता आणि सध्या तो बरा होत आहे.

अनुभवी अष्टपैलू जडेजा एकदिवसीय संघात परतला आहे. निवड समितीने अक्षर पटेलला विश्रांती दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अलिकडच्या एकदिवसीय मालिकेत जडेजाला संधी मिळाली नव्हती. तो शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारतासाठी एकदिवसीय खेळताना दिसला होता. पंत देखील जडेजासोबत एकदिवसीय संघात परतला आहे. दरम्यान, ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

बोर्डाने जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघात आठ फलंदाज, तीन अष्टपैलू खेळाडू, तीन वेगवान गोलंदाज आणि एक विशेषज्ञ फिरकी गोलंदाज आहेत.

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल, केएल राहुल (यष्टीरक्षक) आणि ऋषभ पंत (यष्टीरक्षक) यांचा फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे. निवड समितीने अष्टपैलू खेळाडू म्हणून वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यावर विश्वास ठेवला आहे. हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांना जलद गोलंदाजीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कुलदीप यादवला विशेषज्ञ फिरकी गोलंदाज म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना आगामी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. दोघेही सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत खेळत आहेत. निवड समितीने त्यांच्या कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना विश्रांती दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande