
नवी दिल्ली , 23 नोव्हेंबर (हिं.स.)।दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या जी- 20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांची भेट झाली. भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि भारत–फ्रान्स मैत्रीच्या बळकटीवर भर दिला. राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांनी या भेटीची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून दिली.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन म्हणाले, “धन्यवाद, माझे मित्र नरेंद्र मोदी. देश तेव्हाच अधिक मजबूत होतात, जेव्हा ते एकत्र पुढे जातात. भारत आणि फ्रान्सची मैत्री चिरायू होवो.” पंतप्रधान मोदींनीही ही भेट अत्यंत फलदायी संवाद असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, “जोहान्सबर्ग जी-20 शिखर परिषदेदरम्यान राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांची भेट घेऊन आनंद झाला. अनेक मुद्द्यांवर उपयोगी चर्चा झाली. भारत–फ्रान्स संबंध हे जगासाठी एक सकारात्मक शक्ती आहेत.”
दरम्यान, जी-20 शिखर परिषदेच्या दुसऱ्या सत्रात पंतप्रधान मोदींनी वाढत्या नैसर्गिक आपत्तींबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, जगभरातील आपत्तींची संख्या आणि त्यांचा परिणाम सतत वाढत आहे, जे मानवजातीसमोर एक मोठे आव्हान आहे. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, भारताने आपल्या 2023 मधील जी-20 अध्यक्षतेदरम्यान ‘डिझास्टर रिस्क रिडक्शन वर्किंग ग्रुप’ तयार केला होता, जेणेकरून आपत्ती व्यवस्थापनात जागतिक सहकार्य वाढवता येईल. यासाठी त्यांनी दक्षिण आफ्रिकेने या विषयाला प्राधान्य दिल्याबद्दल कौतुक केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता केवळ ‘रिस्पॉन्स’वर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ‘डेव्हलपमेंट-सेन्ट्रिक’ म्हणजेच विकास-केंद्रित दृष्टीकोन स्वीकारण्याची वेळ आली आहे, जेणेकरून आपत्ती येण्यापूर्वीच सक्षम तयारी करता येईल. त्यांनी जी-20 देशांच्या अवकाश संस्थांनी एकमेकांशी उपग्रह माहिती (सॅटेलाइट डेटा) शेअर करण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच ‘जी-20 ओपन सॅटेलाइट डेटा पार्टनरशिप’ तयार करण्याचे सुचविले, ज्याचा विशेषतः ग्लोबल साऊथमधील (विकसनशील देशांमधील) राष्ट्रांना मोठा फायदा होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode