

मुंबई, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतामध्ये रॉयल एनफील्डनं आपल्या लोकप्रिय ॲडव्हेंचर मोटरसायकल हिमालयन 450 ची खास ‘माना ब्लॅक एडिशन’ आवृत्ती लाँच केली आहे. ऑफ-रोड रायडिंगला अधिक सक्षम आणि साहसी स्वरूप देण्यासाठी ही बाइक विशेष डिझाइन करण्यात आली असून तिची एक्स-शोरूम किंमत 3.37 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. स्टँडर्ड हिमालयन 450 पेक्षा ही आवृत्ती 17,000 रुपयांनी अधिक महाग आहे. आजपासून देशभरातील रॉयल एनफील्ड डीलरशिपवर या स्पेशल एडिशनचे बुकिंग सुरू झाले आहे.
या एडिशनचे अनावरण प्रथम ईआयसीएमए 2025 कार्यक्रमात करण्यात आले होते. हिमालयातील प्रसिद्ध ‘माना पास’ खिंडीपासून प्रेरणा घेऊन ही मोटरसायकल विकसित करण्यात आली आहे. स्टेल्थ ब्लॅक रंगसंगती, खडतर मार्गांसाठी तयार करण्यात आलेले बॉडी पॅनल्स आणि सुधारित एर्गोनॉमिक्समुळे ही बाइक पूर्णपणे ऑफ-रोड केंद्रित वाटते. फॅक्टरी-फिटेड ॲडव्हेंचर ॲक्सेसरीजसह ही आवृत्ती उपलब्ध आहे, ज्यामध्ये ब्लॅक रॅली हँडगार्ड्स, रॅली सीट, रॅली मड गार्ड आणि ट्यूबलेस स्पोक व्हील्सचा समावेश आहे. स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत सुधारित रियर सेक्शनमुळे वजनात 1 किलो घट झाली असून आता या बाईकचे ड्राय वजन 195 किलो आहे. सीट आणि हँडलबारची पोजिशनही ऑफ-रोड रायडिंगसाठी अधिक अनुकूलित करण्यात आली आहे.
माना ब्लॅक एडिशनमध्ये इंजिन आणि चेसिसमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यामध्ये स्टँडर्ड हिमालयन 450 प्रमाणेच 452 सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे, जे 39.5 एचपी पॉवर आणि 40 एनएम टॉर्क निर्माण करते. 6-स्पीड गियरबॉक्स आणि स्लिपर क्लचचे यंत्रणाही यामध्ये कायम ठेवण्यात आले आहेत. चेसिस, स्विंगआर्म, व्हील साइज, टायर कंपाऊंड आणि राइड हाइटमध्येही कोणत्याही प्रकारचा बदल नाही.
रॉयल एनफील्डनं ही मोटरसायकल खासकरून त्या रायडर्ससाठी तयार केली आहे, जे हिमालयनच्या ऑफ-रोड क्षमतांचा पूर्ण अनुभव घेऊ इच्छितात, पण अतिरिक्त ॲक्सेसरीज बसवण्याचा खर्च आणि वेळ वाचवू इच्छितात. फॅक्टरीतूनच ॲडव्हेंचर किटसह मिळणारी ही बाइक ‘रेडी टू रॅली’ स्वरूपात डिलिव्हरीसाठी उपलब्ध आहे. ही स्पेशल एडिशन केवळ मर्यादित कालावधीसाठी किंवा मर्यादित युनिट्समध्ये उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर डीलरशिपला भेट देऊन बुकिंगची प्रक्रिया पूर्ण करावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule