
ठाणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धा 2025-26 चे आयोजन दि.21 ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सेंचुरी रेयॉन हायस्कूल येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन दि.22 नोव्हेंबर 2025 रोजी उपायुक्त, क्रीडा उल्हासनगर महानगरपालिका श्रीम. स्नेहा कर्पे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संतोष आव्हाड , आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू श्री.सचिन म्हसकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सेंचुरी रेयॉन हायस्कूलचे कार्यकारी प्रमुख श्रीकांत गोरे, सेंच्युरी रेयॉन चे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.मिलिंद भांडारकर, बी.के.बिर्ला महाविद्यालय तसेच शाळा व्यवस्थापनाचे मुख्याध्यापक तसेच संचालक कुलगुरू डॉ.नरेशचंद्र, सेंचुरी रेऑन शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना बदाने, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के,पर्यवेक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ विभागांमधून मुलामुलींचे एकूण सोळा संघ सहभागी झाले होते. या संघांमधून मुलींच्या गटात लातूर विभागाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून नागपूर तसेच छत्रपती संभाजी नगर यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झाले. तर 14 वर्षाखालील मुले या गटात प्रथम क्रमांक कोल्हापूर या विभागास प्राप्त झाला असून लातूर व मुंबई या विभागांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झाले.
ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेमधून स्पर्धेत सहभागी सर्वच आठही विभागातील खेळाडूंना उत्तम प्रतीचे ट्रॅक सूट देण्यात आले. तसेच स्पर्धेतील प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्ह, मेडल आणि प्रत्येक विजयी खेळाडूला स्मार्ट वॉच देण्यात आले.
ही स्पर्धा अत्यंत उत्साहाने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या स्पर्धेकरिता जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ तसेच सेंचुरी रेयॉन हायस्कूलचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर