
पणजी, 23 नोव्हेंबर (हिं.स.) -
'अ ग्लोबल इंडिया थ्रू इंडिपेंडंट सिनेमा: अ विमेन्स पॅनेल' या विषयावरील चर्चासत्रात अभिनेत्री-दिग्दर्शक रजनी बसुमतारी,सिने छायाचित्रकार फौझिया फातिमा, अभिनेत्री-दिग्दर्शक रॅचेल ग्रिफिथ्स आणि अभिनेत्री-दिग्दर्शक मीनाक्षी जयन या चार प्रभावी व्यक्ती एकत्र आल्या होत्या. महिलांचा सर्जनशील आणि वैयक्तिक प्रवास स्वतंत्र सिनेमाचे भविष्य कसे घडवत आहे, यावर या चर्चेत उहापोह करण्यात आला.
चर्चेची सुरुवात महिलांच्या चित्रपट निर्मितीचा एक परिभाषित घटक म्हणून सहानुभावाविषयी विचार व्यक्त करुन झाली. फौझिया यांनी सांगितले की, कल्पना सुचण्यापासून ते अंतिम फ्रेमपर्यंतची संपूर्ण सर्जनशील प्रक्रिया सहानुभावावर आधारित असते, त्यामुळे चित्रपटकर्त्यांना स्थानिक कथांचे जागतिक महत्त्व असलेल्या कथांमध्ये रूपांतर करणे शक्य होते. रजनी यांनी पुस्ती जोडली की, स्त्रिया अनेकदा जीवनातील अगदी लहानसहान तपशीलांची दखल घेतात आणि या सूक्ष्म निरीक्षणांमुळेच त्यांना एरवी सांगितल्या गेल्या नसत्या अशा कथांना आवाज देणे शक्य होते.
चर्चा प्रतिनिधित्वाच्या मुद्दयाकडे वळली, तेव्हा वक्त्यांनी आज चित्रपट उद्योगात स्त्रियांची दखल अधिक घेतली जात आहे का, याचा उहापोह केला. त्यांच्या चित्रपटउद्योगात महिला छायाचित्रकार आणि निर्मात्यांची संख्या वाढत आहे, असे रॅचेल यांनी सांगितले. फौझिया यांनी 'इंडियन वुमन सिनेमॅटोग्राफर्स कलेक्टिव्ह'च्या प्रवासाची माहिती दिली. याची सुरुवात 2017 मध्ये मोजक्या सदस्यांसह झाली होती आणि आता ती संख्या जवळजवळ 200 पर्यंत वाढली आहे, त्यात नवख्या ते अनुभवी सदस्यांचा समावेश आहे. या समूहामुळे मार्गदर्शन आणि सहकार्याला प्रोत्साहन मिळते आणि उद्योगात महिलांना बऱ्याच काळापासून आवश्यक असलेले पोषक वातावरण कसे उपलब्ध होते, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, त्यांनी इफ्फीमध्ये महिला सिने छायाचित्रकारांच्या उपस्थितीचे कौतुक केले आणि 'विमुक्ती' चित्रपटा मधील शैली शर्मा व 'शेप ऑफ मोमो' मधील अर्चना घांग्रेकर यांच्या कामाची प्रशंसा केली.
रजनी यांनी आठवण सांगितली की, दोन वर्षांपूर्वी त्यांना त्यांच्या स्वतःच्या प्रकल्पासाठी या कलेक्टिव्हमधील सिने छायाचित्रकारांचा संदर्भ देण्यात आला होता, त्यामुळे अशा नेटवर्कचा प्रभाव अधोरेखित होतो. मीनाक्षी यांनी केरळ राज्य सरकारच्या महिलांनी बनवलेल्या चित्रपटांना अर्थसाहाय्य देणाऱ्या उपक्रमावर प्रकाश टाकला आणि आपला 'व्हिक्टोरिया' चित्रपट या संधीतूनच साकार झाला अशी माहिती दिली. फौझिया यांनी महिलांच्या नेतृत्वाखालील चित्रपटांना पाठिंबा देणाऱ्या या केरळ सरकारच्या उपक्रमाच्या पहिल्या निवड समितीवर काम केले होते, त्यांनी पुरुषांनी महिलांच्या नावाने प्रकल्प सादर केल्याबद्दलच्या समस्येकडे लक्ष वेधले आणि सतत सतर्क राहण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले.
त्यानंतर वक्त्यांनी चित्रपट निर्मिती आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल राखण्यातील आव्हानांवर चर्चा केली. रॅचेल यांनी तीन मुलांचे संगोपन करताना चित्रपट उद्योगात काम करण्याबद्दल मोकळेपणाने सांगितले आणि महिलांना पाठिंबा देण्यासाठी 'आळीपाळीने बदललेले कामाचे आठवडे' यांसारखे प्रारुप सुचवले. फौझिया यांनी मातृत्वानंतर आपल्या कामाकडे परतण्यातील अडचणी सांगितल्या आणि आपली कारकीर्द सुरू राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, विशेषतः विजय सेतुपती यांच्यासोबतच्या त्यांच्या आगामी 'ट्रेन' या व्यावसायिक चित्रपटाचा उल्लेख त्यांनी केला.
कलाकार ऑन -सेट कथांना कसा आकार देतात या प्रश्नावर मीनाक्षी म्हणाल्या की, नवोदित कलाकारांना अनेकदा त्यांचे सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य नसते, परंतु जसजशी कारकीर्द पुढे जाते तसतसे तिला अधिक महिला चित्रपट निर्मात्यांसोबत काम करण्याची आशा असते. रजनी म्हणाल्या की, ओटीटी प्लॅटफॉर्मने महिलांसाठी उपलब्ध असलेल्या भूमिकांचा विस्तार केला आहे, ज्यामुळे त्यांच्या भूमिकेला अधिक खोली आणि अस्तित्व मिळाले आहे. फौजिया म्हणाल्या की, अधिक महिला कलाकार आता निर्मिती क्षेत्रात प्रवेश करत आहेत, ज्यामुळे सर्जनशील निर्णय घेणाऱ्यांची व्याप्ती रुंदावत आहे. मीनाक्षीने एक दिवस चित्रपट निर्मिती करण्याची तिची स्वतःची इच्छा व्यक्त केली, तर रेचलने हॉलिवूडमध्ये महिला निर्मात्यांची दीर्घ काळापासूनची उपस्थिती आणि त्यांना येणाऱ्या अडचणींवर भाष्य केले. रेचलने वेतन समानतेचाही उल्लेख केला, अर्थपूर्ण बदलासाठी पुरुषांनी असमतोल स्वीकारावा आणि महिलांसाठी निष्पक्षता सुनिश्चित करणाऱ्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा असे नमूद केले.
जेव्हा चर्चा लेखन आणि प्रक्रियेकडे वळली, तेव्हा रजनी यांनी स्थानिक वास्तव आणि तिच्या प्रदेशाने अनुभवलेल्या पिढीजात वेदनांवर आधारित तिच्या कथा मांडल्या. तिच्या अलीकडील चित्रपटात लैंगिक न्यायाचा शोध घेण्यासाठी सर्व महिला कलाकार आहेत. मीनाक्षी पुढे म्हणाली की तिचा 'व्हिक्टोरिया' हा चित्रपट सर्व महिला कलाकारांभोवती होता आणि या निर्णयावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले कारण यामुळे नेहमीची चौकट बदलली होती.
पॅनेलने चित्रपट बनवण्याच्या आणि टिकवण्याच्या वास्तवावर चर्चा केली. रेचल यांनी नमूद केले की चित्रपट निर्मात्यांनी अशा कथा तयार कराव्यात ज्या त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकतील, योग्य कथानक ज्या लोकांसाठी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल असा विश्वास बाळगावा. रजनी पुढे म्हणाल्या की तिचे चित्रपट कमी बजेट मध्ये बनवले आहेत आणि त्यांना महिला निर्मात्यांचा पाठिंबा आहे आणि तिने सुनिश्चित केले आहे की त्यांना कधीही तोटा सहन करावा लागणार नाही.
सत्र संपता संपता, पॅनेलच्या सदस्यांना विचारण्यात आले की प्रत्येकाने कोणते चित्रपट पहावेत असे त्यांना वाटते. रेचलने मुलींच्या भूमिकांसाठी दंगलचे नाव घेतले; फौजियाने द पॉवर ऑफ द डॉगची निवड केली; रजनीने आर्टिकल 15 आणि आय इन द स्कायची शिफारस केली; आणि मीनाक्षीने चिंताग्रस्त चित्रणासाठी शिवा बेबीची निवड केली, आणि मिश्किल हसत ती स्वतःच्या 'व्हिक्टोरिया' चित्रपटाची देखील शिफारस करेल असे तिने सांगितले.
सत्राचा शेवट सकारात्मकता आणि शक्यतांच्या क्षणाने झाला. मीनाक्षीने ऑस्ट्रेलियन चित्रपट उद्योगाचे त्याच्या प्रगतीशील परिदृश्यासाठी कौतुक केले आणि अॅडलेड फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिने पाहिलेल्या एका चित्रपटाची आठवण सांगितली ज्यामध्ये तिला अभिनय करण्याची इच्छा होती. रेचलने सौहार्दपूर्ण प्रतिसाद देत सुचवले की चारही महिला एके दिवशी सहयोग करू शकतात, ही दुपारची भावना प्रत्यक्षात आणू शकतात : महिला एकत्र मिळून नवीन भविष्याची कल्पना करतात आणि स्वतंत्र सिनेमा त्या भविष्यांची सुरुवात करण्यासाठी अवकाश प्रदान करतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी