
रत्नागिरी, 23 नोव्हेंबर, (हिं. स.) : महावितरण कंपनीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोकण परिमंडळाने कौतुकास्पद कामगिरी केली.
महावितरण आपल्या कर्मचाऱ्यांतील खेळ गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करते. महावितरणच्या अनेक महिला व पुरुष खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये त्यांच्या यशोगाथा पोहोचविल्या आहेत. महावितरणच्या १६ परिमंडळांमधील खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेतात. यावर्षीसुद्धा अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडली. स्पर्धेत कल्याण व रत्नागिरी परिमंडळाने सहभाग घेतला होता. या चार दिवसांच्या खेळ स्पर्धेत महावितरण कोकण परिमंडळातील खेळाडूंनी १ सुवर्ण आणि ४ रौप्य पदके जिंकली. रत्नागिरी परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
शरीरसौष्ठव ७० किलो गटात सिंधुदुर्गातील गोपाळ कुलकर्णी यांनी सुवर्णपदक पटकावले. रत्नागिरीतील विजेते असे - शरीरसौष्ठव - 75 किलो गट : राजेंद्र जाधव - रौप्य पदक, शरीरसौष्ठव - 90 किलो गट : अपूर्व शिर्के - रौप्य पदक, भाला फेक (पुरुष) : मिलिंद डाफळे - रौप्य पदक, कुस्ती - 70 किलो गट : सरदार हराळे - रौप्य पदक
या यशामुळे कोकण परिमंडळाचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून आगामी क्रीडा स्पर्धांमध्ये अजून मोठी झेप घेण्यासाठी हे यश निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे,असे प्रतिपादन रत्नागिरी परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी केले. तसेच खेळाडू, प्रशिक्षक आणि संबंधित सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी