
कर्तव्यपथ आणि संसदमार्ग पोलिसात एफआयआर दाखल
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीच्या इंडिया गेट परिसरात रविवारी संध्याकाळी नक्षली कमांडर माडवी हिडमा यांच्या समर्थनार्थ पोस्टर आणि घोषणाबाजी करणाऱ्या 23 जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलीय. कर्तव्यपथ पोलिस ठाण्यात 6 आणि संसदमार्ग पोलिसात 17 जणांवर हे गुन्हे दाखल झाले आहेत.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार नवी दिल्लीत रविवारी 23 नोव्हेंबरला ‘दिल्ली कोऑर्डिनेशन कमिटी फॉर क्लीन एअर’ या संस्थेने प्रदूषणाच्या विरोधात आंदोलन केले. प्रदूषणविरोधी आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी नक्षलवादी हिडमाचे स्केच असलेले पोस्टर दाखवत “कितने हिडमा मारोगे”, “अमर रहे हिडमा” अशा घोषणा दिल्या. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. याप्रकरणी कर्तव्यपथ पोलिस ठाण्यात 6 आंदोलकांना अटक करून त्यांच्यावर कलम 74, 70, 105 (2) ,132, 221, 223 आमि 6 (2) अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच संसद मार्ग पोलिसात कलम 223 (अ),132, 221,121-ए, 126 (2) आणि 3(5) अनुसार गुन्हा नोंदवून 17 जणांना ताब्यात घेण्यात आले. आंदोलकांनी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना हटवण्यासाठी काहींनी पेपर स्प्रेचा वापर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इंडिया गेट परिसरात आंदोलनास परवानगी नसतानाही जमाव जमला होता.
आंदोलकांचा दावा आहे की ते केवळ दिल्लीतील गंभीर प्रदूषणाविरोधात आवाज उठवत होते. काहींचे म्हणणे होते की हिडमा आदिवासी हक्कांसाठी लढणारा होता, ज्यामुळेही वाद अधिक पेटला.दिल्लीचे विकास मंत्री कपिल मिश्रा यांनी पोलिस कारवाईचे समर्थन केले. त्यांनी म्हटले की प्रदूषण आंदोलनाच्या नावाखाली नक्षलवादी विचारधारा पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे.---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी