


चेन्नई, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यात सोमवारी सकाळी दोन बसेसमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर सुमारे ३० प्रवासी जखमी झाले. मृतांमध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मदुराईहून सेनकोट्टईला जाणारी बस आणि तेनकासीहून कोविलपट्टीकडे निघालेली बस यांच्यात सकाळी सुमारे ११ वाजता समोरासमोर भीषण धडक झाली. प्राथमिक तपासात मदुराईकडून येणारी बस बेदरकारपणे आणि अतिवेगात चालवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांसह बचाव मोहिमेत सहभागी झाले. अनेक प्रवासी बसमध्ये अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने बसचे खराब झालेले भाग कापण्यात आले. त्यानंतर २५ हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी तेनकासी-कडयानल्लूर बस अपघातात सहा जणांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की त्यांनी तात्काळ जिल्हा प्रभारी मंत्री केकेएसएसआर रामचंद्रन यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले.
स्टॅलिन यांनी पुढे सांगितले की त्यांनी अपघातस्थळी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून सर्व जखमी प्रवाशांना उच्च दर्जाचे उपचार मिळावेत यासाठी सरकारी रुग्णालयात जाण्याचे निर्देश दिले आहेत.
मृतांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त करताना, मुख्यमंत्री म्हणाले की सरकार त्यांच्यासोबत आहे आणि जखमींच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी वचनबद्ध आहे.
या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे आणि अपघाताचे कारण समजण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule