अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिकचे उत्पादन बंद; होंडाची मोठी नामुष्की
मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। भारताच्या पेट्रोल स्कूटर बाजारात वर्चस्व गाजवणाऱ्या होंडा अ‍ॅक्टिव्हाच्या इलेक्ट्रिक व्हर्जनने मात्र अक्षरशः निराशा केली आहे. होंडा अ‍ॅक्टिवा इलेक्ट्रिक आणि QC1 या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर्सचं उत्पादन कंपनीने थांबवलं अ
Honda Activa Electric


मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। भारताच्या पेट्रोल स्कूटर बाजारात वर्चस्व गाजवणाऱ्या होंडा अ‍ॅक्टिव्हाच्या इलेक्ट्रिक व्हर्जनने मात्र अक्षरशः निराशा केली आहे. होंडा अ‍ॅक्टिवा इलेक्ट्रिक आणि QC1 या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर्सचं उत्पादन कंपनीने थांबवलं असून, तयार करण्यात आलेल्या स्कूटर्सपैकी निम्म्याहून कमी युनिट्स विकल्या गेल्या आहेत. ग्राहकांकडून झालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे होंडासारख्या मोठ्या ब्रँडला ही स्कूटर्स बाजारातून मागे घ्यावी लागली आहेत.

सर्वात मोठी तक्रार डिक्कीच्या अभावामुळे आली. महिलांची पर्स, ऑफिस फाईल्स किंवा रोजच्या वस्तू ठेवण्यासाठी स्कूटरमध्ये डिक्की आवश्यक मानली जाते. परंतु या दोन्ही मॉडेल्समध्ये अगदी छोट्या पिशवीसाठी देखील जागा उपलब्ध नव्हती, ज्यामुळे ग्राहकांनी या स्कूटर्सकडे पाठ फिरवली. परिणामी हजारो स्कूटर्स होंडाच्या प्लांटमध्येच न विकल्या गेलेल्या अवस्थेत पडून राहिल्या आणि कंपनीसमोर उत्पादन थांबवण्याशिवाय पर्याय उरला नाही.

SIAM द्वारे उपलब्ध आकडेवारीनुसार, फेब्रुवारी ते जुलै 2025 दरम्यान होंडाने अ‍ॅक्टिवा e आणि QC1 मिळून 11,168 युनिट्स तयार केल्या परंतु केवळ 5,201 युनिट्स डीलर्सपर्यंत पोहोचवण्यात कंपनीला यश आले. म्हणजेच अर्ध्याहून अधिक युनिट्स अजूनही कंपनीकडेच स्टॉकमध्ये पडून आहेत. याच वेळी बजाज, टीव्हीएस, एथर आणि ओला सारख्या कंपन्यांनी या सेगमेंटमध्ये दमदार फीचर्स, मोठी रेंज आणि आकर्षक डिझाइनसह उत्पादने देऊन बाजारात मजबूत पाय रोवला.

अ‍ॅक्टिवा e मध्ये बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान देण्यात आले असले तरी त्यासाठी लागणारी मोठी स्वॅपिंग स्टेशन नेटवर्क कंपनीकडे नव्हती. केवळ मुंबई, दिल्ली आणि बंगळूर या तीन शहरांमध्येच अ‍ॅक्टिवा e उपलब्ध होती, तर QC1 फक्त सहा शहरांमध्ये विक्रीस होती. मर्यादित उपलब्धता आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या अभावामुळे ग्राहकांनी इतर ब्रँडची निवड केली.

ऑगस्टपासून या दोन्ही मॉडेल्सचे उत्पादन पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. बाजारात इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये होंडाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु ग्राहकांच्या मूलभूत गरजा न ओळखल्याने कंपनीला मोठा धक्का बसला आहे. आता होंडा भविष्यातील ईव्ही रणनीतीवर पुनर्विचार करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande