
मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून ओला इलेक्ट्रिकच्या दुचाकीबाबत ग्राहकांकडून मोठ्या तक्रारी समोर येत आहेत. विक्री केल्यानंतर योग्य दुरुस्ती सेवा न मिळाल्याने अनेक ई-स्कूटर धूळखात पडल्या आहेत. यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागल्याचं सांगत ग्राहकांनी सोशल मीडियावर ‘बॉयकॉट ओला’ अशी मोहीम छेडली आहे. या परिस्थितीचा थेट फायदा एथर एनर्जीला मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे.
एथरने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दमदार ऑफर्स उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे मागील तिमाहीत कंपनीने लक्षणीय वाढ नोंदवली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांचा समावेश असलेल्या मध्य भारतातील बाजारपेठेत एथरचा मार्केट शेअर ८.८ टक्क्यांवरून तब्बल १४.६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. या वाढीत महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली असून केवळ दोन तिमाहीत राज्यातील मार्केट शेअर ९.४ टक्क्यांवरून १४.६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
एथरची महाराष्ट्रात ८० पेक्षा अधिक शोरूम्सची मजबूत उपस्थिती असून ४८० हून अधिक चार्जिंग पॉइंट्स उपलब्ध आहेत. मुंबई, पुणे, नागपूरसह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर अशा निमशहरी भागातही कंपनीने बाजारपेठ वाढवली आहे. ग्राहकांसाठी सर्वात महत्त्वाचा असणारा दुरुस्ती सेवांचा प्रश्न एथरने प्रभावीपणे सोडवला आहे. प्रत्येक शोरूमसोबत सर्व्हिस सेंटर उपलब्ध असून १० किमी अंतरात दोन शोरूम असतील तर एक सर्व्हिस सेंटर सतत तत्पर असते. त्यामुळे विक्रीनंतरची सेवा मिळण्याबाबत ग्राहकांचा विश्वास अधिक बळकट होत आहे.
एथरच्या बॅटरीची विश्वासार्हता देखील ग्राहकांना आकर्षित करणारी आहे. बॅटरी लाईफ ७ ते ८ वर्षे टिकते आणि खराब होण्याचे प्रमाणही अत्यल्प असल्याचं कंपनीकडून सांगितलं जातं. त्यासोबतच कंपनीने बाजारात पहिल्यांदाच BuyBack स्कीम उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना त्यांच्या स्कूटर ३६ ते ४८ महिन्यांत परत करायची असल्यास एक्स-शोरूम किंमतीच्या ५० ते ६० टक्के रक्कम परत मिळते. ३६ महिन्यांत परत केल्यास ६० टक्के आणि ४८ महिन्यांनी परत केल्यास ५० टक्क्यांपर्यंतची रक्कम कंपनी देण्याची हमी देते.
या सर्व ऑफर्स आणि उत्तम सेवेमुळे एथरच्या वाहन विक्रीत तब्बल ६७ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील तीन महिन्यांत कंपनीने ६५,५९५ यूनिट्सची विक्री करत आजवरचा सर्वाधिक तिमाही महसूल ९४०.७ कोटी रुपये नोंदवला आहे. ओलाच्या ग्राहकसेवेतल्या कमतरतेचा परिणाम म्हणून ईव्ही क्षेत्रातील विश्वास एथरने पुन्हा उंचावल्याचं स्पष्ट दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule