डिसेंबरमध्ये बँका 18 दिवस राहणार बंद
मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। 2025 च्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये देशातील विविध राज्यांतील सण-उत्सव, स्थानिक सुट्ट्या आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँका एकूण 18 दिवस बंद राहणार आहेत. ख्रिसमससह अनेक महत्वाच्या धार्मिक व सांस्कृतिक दिवसांनि
Banks remain closed


मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। 2025 च्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये देशातील विविध राज्यांतील सण-उत्सव, स्थानिक सुट्ट्या आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँका एकूण 18 दिवस बंद राहणार आहेत. ख्रिसमससह अनेक महत्वाच्या धार्मिक व सांस्कृतिक दिवसांनिमित्त वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये चेक जमा करणे, डीडी काढणे, खाते उघडणे किंवा कर्जासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करायची असल्यास सुट्ट्यांचे नियोजन करूनच बँकेत भेट देणे आवश्यक ठरणार आहे.

डिसेंबर महिन्यात 1 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशात इंडिजिनस फेथ डे, 3 डिसेंबरला गोव्यात सेंट फ्रान्सिस झेविअर उत्सव, तर 12 डिसेंबरला मेघालयात पा तोगन नेंगमिंजा संगमा दिवसानिमित्त बँका बंद राहतील. 18 डिसेंबरला छत्तीसगडमध्ये गुरु घासीदास जयंती आणि मेघालयात यू सोसो थम पुण्यतिथी असून त्या राज्यांमध्ये बँक व्यवहार बंद असतील. 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्यात बँका बंद राहतील. 24 डिसेंबरला ख्रिसमस ईवसाठी मेघालय आणि मिझोरममध्ये, तर 25 डिसेंबरला ख्रिसमसचा सार्वत्रिक सण असल्याने बहुतांश राज्यांत बँकांना सुट्टी असेल.

26 डिसेंबरला मेघालय, मिझोरम आणि तेलंगाणात ख्रिसमस सेलीब्रेशन तसेच हरियाणात शहीद उधमसिंह जयंतीमुळे बँका बंद असतील. त्यानंतर 27 डिसेंबरला हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात गुरु गोविंद सिंह जयंतीनिमित्त सुट्टी आहे. 30 डिसेंबरला मेघालयात यू कियांग नांगबाह दिवस तसेच सिक्कीममध्ये तामू लोसरच्या निमित्ताने सुट्टी असेल. 31 डिसेंबरला नववर्ष स्वागतासाठी मिझोरम आणि मणिपूरमधील बँका बंद राहणार आहेत.

याशिवाय 7, 14, 21 आणि 28 डिसेंबर हे रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल. तर 13 डिसेंबर आणि 27 डिसेंबरला अनुक्रमे दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने त्या दिवशीसुद्धा बँका बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या महत्वाच्या वित्तीय कामांचे नियोजन आधीच करणे अत्यंत गरजेचे आहे.

बँका बंद असल्यानाही ऑनलाईन व्यवहार सुरळीत सुरू राहतील. नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआयद्वारे निधी हस्तांतरण, एटीएममधून रोख रक्कम काढणे यांसारख्या सुविधांचा वापर कोणत्याही दिवशी करता येणार आहे. डिजिटल व्यवहारांमुळे ग्राहकांना तातडीच्या आर्थिक गरजांमध्ये अडचण येणार नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यातील सुट्ट्यांचा विचार करूनच तुम्ही तुमच्या बँकिंग कामांचे नियोजन करावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande