
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : कर्नाटकमध्ये सत्ताबदलाच्या मागणीने आता काँग्रेस हायकमांडची डोकेदुखी अधिकच वाढवली आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या समर्थक आमदारांचा तिसरा गटही दिल्लीला दाखल झाला असून, राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
शिवकुमार समर्थक दोन गट यापूर्वीच दिल्लीमध्ये पोहोचले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नव्याने पोहोचलेल्या तिसऱ्या गटात सुमारे सहा ते आठ आमदारांचा समावेश आहे. या सर्व आमदारांची मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेतृत्वाकडून स्पष्ट भूमिका मिळावी अशी अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात ही तिसरी वेळ आहे, जेव्हा शिवकुमार समर्थक आमदार दिल्लीकडे कूच करत आहेत, ज्यामुळे बेंगळुरूपासून दिल्लीपर्यंत राजकीय तापमान वाढले आहे.
काँग्रेस नेतृत्वाची चिंता वाढली
दिल्लीमध्ये शिवकुमार समर्थक आमदार ठिय्या मांडून बसले असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मात्र बेंगळुरूतच थांबले आहेत. त्यांचा दिल्लीचा प्रस्तावित दौरा पुढे ढकलला गेला असून, ते राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी सतत चर्चा करत असल्याची माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली. पक्ष नेतृत्वाने सध्या कोणत्याही घाईघाईतील निर्णयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले जाते. खरगे यांच्या कर्नाटक दौऱ्यापूर्वी झालेल्या डिनर मीटिंगमध्ये काही नेत्यांनी नेतृत्वाने परिस्थितीबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे वाढत असलेली आमदारांची गर्दी पक्षातील वाढत्या असंतोषाचे संकेत देत आहे.
नेत्यांची मौन भूमिका
कर्नाटक काँग्रेसमधील या घडामोडींवर बहुतांश नेते मौन बाळगत आहेत. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी मात्र अलीकडेच प्रतिक्रिया देताना म्हटले होते, “सर्व आमदार माझेच आहेत,” असे विधान करून त्यांनी तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी