


नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। येणाऱ्या पिढ्यांसाठी अधिकाधिक गोष्टींचे जतन करताना, कमीतकमी स्त्रोतांसह अधिक उत्पादन यासह कृषी क्षेत्राने पुढील वाटचाल केली पाहिजे. कृषीशास्त्र हा वैज्ञानिक संशोधनाला शेतकऱ्यांच्या शेताशी जोडणारा सेतू आहे. असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले. ते नवी दिल्लीत, पुसा येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेच्या (एनपीएल) सभागृहात सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्र संमेलनाचे (आयएसी-2025) उद्घाटना वेळी बोलत होते.
भारतातील तसेच परदेशातील वैज्ञानिक, धोरणकर्ते, विद्यार्थी, विकासात्मक भागीदार तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ञ असे 1,000 हून अधिक प्रतिनिधी या तीन दिवसीय संमेलनात सहभागी होत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत वैज्ञानिक या कार्यक्रमात उपस्थित आहेत.
केंद्रीय कृषीमंत्री पुढे म्हणाले की, विकसित भारत @2047 चा पाया स्मार्ट, टिकाऊ आणि फायदेशीर शेती यावर आधारलेला आहे. ते म्हणाले, येणाऱ्या पिढ्यांसाठी अधिकाधिक गोष्टींचे जतन करताना, कमीतकमी स्त्रोतांसह अधिक उत्पादन यासह कृषी क्षेत्राने पुढील वाटचाल केली पाहिजे. मृदा आरोग्यात सुधारणा, पाण्याचा कार्यक्षम वापर, जैवविविधता, पर्यावरणीय पोषण तसेच डिजिटल शेती या मुद्द्यांवर केंद्रीय मंत्र्यांनी अधिक भर दिला. या संमेलनातील विचारमंथनातून हाती येणाऱ्या शिफारसी राष्ट्रीय धोरणांमध्ये आणि क्षेत्रीय कृती योजनांमध्ये समाविष्ट करण्यात येतील अशी घोषणा देखील त्यांनी केली.
उद्घाटनपर सत्रात केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांनी आयएसी 2025 जाहीरनामा जारी केला, त्यामध्ये खालील महत्त्वपूर्ण शिफारसींचा समावेश आहे:
• मृदा-कार्बन सीक्वेस्ट्रेशन आणि जल-कार्यक्षम शेती
• कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित डिजिटल कृषी उपाययोजना आणि अॅग्री-स्टॅक आराखडा यांचे प्रमाण वाढवणे.
• नैसर्गिक तसेच पुनरुत्पादक कृषी पद्धतीच्या नमुन्यांना मुख्य प्रवाहात आणणे
• युवा आणि महिला शेतकऱ्यांसाठी लक्ष्यित नवोन्मेष कार्यक्रम
• शाळा तसेच विद्यापीठ स्तरावर भविष्यवेधी कृषीशास्त्र शिक्षण
• एक- आरोग्य, एलआयएफई अभियान तसेच नेट-झिरो 2070 यांना अनुसरून असलेली कृषी धोरणे
• हवामानाप्रती स्मार्ट असलेल्या भारतीय कृषी पद्धतीच्या नमुन्यांचा जागतिक पातळीवर प्रसार
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री भगीरथ चौधरी म्हणले, “कृषीशास्त्र शेतकऱ्यांचे खरे प्रश्न सोडवण्याचे साधन झाले पाहिजे.” शेतकऱ्यांचे उत्पन्न, पर्यावरणीय सुरक्षितता आणि पोषणाची गुणवत्ता वाढवणे जे कृषीशास्त्राचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे यावर त्यांनी अधिक भर दिला.
या संमेलनादरम्यान आयोजित दहा संकल्पनाधारित परिसंवादांमध्ये खाली विषयांवर आधारित सादरीकरणे होतील:
• हवामान बदलाप्रती लवचिक कृषी आणि कार्बन तटस्थ शेती
• निसर्गाधारित उपाय आणि वन-हेल्थ
• अचूक इनपुट व्यवस्थापन आणि साधनसंपत्ती कार्यक्षमता
• जनुकीय क्षमतेचा वापर
• उर्जा-कार्यक्षम यंत्र सामग्री, डिजिटल उपाययोजना आणि कापणी-पश्चात व्यवस्थापन
• पोषणाप्रती संवेदनशील शेती आणि पर्यावरणीय पोषण
• लिंगभाव सक्षमीकरण आणि उपजीविकेचे वैविध्यीकरण
• कृषी 5.0, आगामी पिढीतील शिक्षण तसेच विकसित भारत 2047
• युवा वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांची परिषद
या संमेलनात आयोजित कार्यक्रमांमधील चर्चांमधून शाश्वत विकास ध्येयांपैकी (एसडीजी) एसडीजी-1, एसडीजी-2, एसडीजी-12, एसडीजी-13 आणि एसडीजी-15 ही ध्येये कृषीशास्त्राच्या मदतीने साध्य करण्यासाठीचे नवे मार्ग तयार होतील.या मंचांवर उदयाला येणारे हे सहयोगात्मक उपक्रम जी20, एफएओ, सीजीआयएआर यांच्याशी भागीदारी आणि दक्षिण-दक्षिण सहकार्य आणखी मजबूत करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule