
जळगाव, 24 नोव्हेंबर (हिं.स.)मुक्ताईनगर शहरात साखरपुड्याच्या वादातून २८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन सख्या भावांना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मयत तरुणाचे नाव विशाल गणेशगीर गोसावी (वय २८, रा. जिजाऊनगर, मुक्ताईनगर) असे आहे.नगरपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशाल गोसावी हा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होता. हॉटेल वृंदावनसमोरील प्लॉटिंग भागातील मोकळ्या जागेत काही नागरिकांना त्याचा मृतदेह आढळला. जवळून तपासल्यावर त्याची चाकूने भोसकून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांनी तातडीने मुक्ताईनगर पोलिसांना माहिती दिली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. यानंतर पोलिसांनी तपासाचा धागा पकडत ऋषिकेश आत्माराम पवार (धनगर) आणि आकाश आत्माराम पवार (धनगर) यांना ताब्यात घेतले. आकाश पवार याचा एका तरुणीसोबत साखरपुडा झाला होता. मात्र त्या तरुणीचे विशाल गोसावी याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आकाशला होता यातून आकाशने भाऊ ऋषिकेशच्या मदतीने विशालची हत्या करण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. विशालला आधी दारू पाजून त्याला बोदवड रस्त्यालगतच्या बंद पडलेल्या उद्यानात नेण्यात आले आणि तिथे चाकूने भोसकून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर