
जळगाव, 24 नोव्हेंबर (हिं.स.) | गेल्या काही दिवसात जळगाव शहरातील विविध भागात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढण्याच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अयोध्या नगर भागात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून पळणाऱ्या दुचाकीस्वारांच्या एका टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
याप्रकरणात दोघांना मुद्देमालांसह जेरबंद करण्यात आले आहे. तेजस अनिल ईखनकर आणि प्रसाद उर्फ परेश संजय महाजन (दोघे रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) असं अटक केलेल्या सोनसाखळी चोरांचे नाव आहे. 16 नोव्हेंबर 2025 रोजी अयोध्या नगरतील एक महिला दुचाकीने घरी पोहोचत असताना मागून आलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने खेचून पोबारा केला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी माहिती गोळा करून आरोपींची ओळख पटवली. माऊली नगर भागात सापळा रचून पोलिसांनी एक संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव तेजस अनिल ईखनकर असे सांगितले आणि गुन्ह्याची कबुलीही दिली. त्याने चोरीत आपला साथीदार प्रसाद महाजन सहभागी असल्याचेही सांगितले. विशेष म्हणजे, प्रसाद उर्फ परेश हा शनिपेठ पोलिस स्टेशन हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यापासून फरार होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर