
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नागरिकांना ट्राय डीएनडी ॲपद्वारे स्पॅम कॉल/एसएमएसशी संबंधित तक्रारी नोंदवण्याचे आवाहन करत त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. व्यक्तिगत फोनवर फसवणुकीचे दूरध्वनी क्रमांक ब्लॉक केल्याने अशा स्पॅमचा उगम थांबवता येणार नाही असेही प्राधिकरणाने अधोरेखित केले आहे.
गेल्या वर्षभरात ट्रायने नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारींवरून कारवाई करत 21 लाखांहून अधिक मोबाईल क्रमांक आणि स्पॅम तसेच फसवे संदेश पाठवण्यात सहभागी असलेल्या सुमारे एक लाख संस्थांचे क्रमांक खंडित केले असून ते काळ्या यादीत टाकले आहेत. देशभरातील दूरसंचार सुविधेचा गैरवापर रोखण्यात वापरकर्त्यांकडून दाखल केल्या जाणाऱ्या सामूहिक तक्रारींची महत्त्वाची भूमिका असल्याचे यावरून दिसून येत आहे.
नागरिकांनी अधिकृत ट्राय डीएनडी ॲपद्वारे स्पॅमची तक्रार केल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करणे शक्य झाले. जेव्हा एखाद्या वापरकर्त्याकडून ट्राय डीएनडी अॅपवर स्पॅम कॉल किंवा एसएमएसची तक्रार नोंदवली जाते, तेव्हा ते प्राधिकरणाला आणि दूरसंचार सेवा पुरवठादारांना संबंधित मोबाइल क्रमांक ट्रॅक करण्याची, त्याची पडताळणी करण्याची आणि ते कायमचे खंडित करण्याची मुभा मिळते. याउलट, तुमच्या फोनवर असे क्रमांक ब्लॉक केल्यास तो क्रमांक फक्त तुमच्या वैयक्तिक फोनवर लपवला जातो - त्यामुळे फसवणूक करणाऱ्याला नवीन क्रमांकाचा वापर करून इतरांशी संपर्क साधण्यापासून रोखले जात नाही.
नागरिकांसाठी सूचना:
·अधिकृत ॲप स्टोअर्सवरून TRAI DND ॲप डाउनलोड करा.
·गुन्हेगारांची ओळख पटवणे शक्य व्हावे तसेच त्यांचे क्रमांक खंडित करण्यास मदत म्हणून त्यांचे क्रमांक आपल्या फोनवर ब्लॉक करण्याऐवजी ट्राय डीएनडी अॅपच्या मदतीने स्पॅम एसएमएस/कॉल्सची तक्रार नोंदवा.
· दूरध्वनी कॉल, मेसेज किंवा समाज माध्यमावरून वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील शेअर करणे टाळा.
· तुम्हाला धमकी देणारा किंवा संशयास्पद कॉल आल्यास तो ताबडतोब डिस्कनेक्ट करा.
· सायबर फसवणुकीची तक्रार 1930 या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर किंवा www.cybercrime.gov.in वर दाखल करा.
· दूरसंचार संसाधनांचा गैरवापर करून फसवणुकीचा प्रयत्न झाल्याची तक्रार संचार साथीच्या चक्षू या फीचरद्वारे नोंदवा
सर्व नागरिकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह दूरसंचार वातावरण उपलब्ध होईल याची खबरदारी घेण्यास प्राधिकरण कटिबद्ध आहे. स्पॅमचा उद्भव रोखण्यासाठी सातत्याने अंमलबजावणी कृती, तंत्रज्ञानाधिष्ठित देखरेख आणि ट्राय डीएनडी ॲपच्या माध्यमातून लोकांचा सहभाग आवश्यक आहे.
ट्राय सर्व नागरिकांना - विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला वापरकर्त्या आणि डिजिटल तंत्राच्या नवख्या किंवा कमी अनुभव असलेल्या वापरकर्त्यांना - सतर्क राहण्याचे, ही सूचना सामायिक करण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद संदेशांची त्वरित तक्रार नोंदविण्याचे आवाहन करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule