अयोध्येत पंतप्रधानांच्या हस्ते फडकणार धर्मध्वजा
अयोध्या, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : राम नगरी अयोध्येत उद्या, मंगळवारी एक महामंगलमय आणि ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. श्रीराम मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावर ‘धर्म ध्वज’ फडकवून मंदिर पूर्णत्वास पोहोचल्याची अधिकृत घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्
राम मंदिर अयोध्या


अयोध्या, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : राम नगरी अयोध्येत उद्या, मंगळवारी एक महामंगलमय आणि ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. श्रीराम मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावर ‘धर्म ध्वज’ फडकवून मंदिर पूर्णत्वास पोहोचल्याची अधिकृत घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पवित्र विधीसाठी पंतप्रधान मोदी उपवासही ठेवणार आहेत. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांनी यावर त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

मंदिराच्या बांधकामाचे तीन टप्पे निश्‍चित करण्यात आले होते—पहिला 2023, दुसरा 2024 आणि तिसरा 2025. मात्र पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर कामाचा वेग वाढवण्यात आला. परकोटा आणि शिखर पूर्ण झाल्यानंतर आता मंदिर संपूर्ण झाले असून ध्वजारोहणाद्वारे या कार्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. राम मंदिरासाठी विशेष बनवण्यात आलेला हा ध्वज 22 फूट लांब व 11 फूट रुंद आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे एका पॅराशूट विशेषज्ञाने हा ध्वज तयार केला असून त्याचे वजन 2 ते 3 किलो आहे. तो मंदिराच्या शिखरासाठी आणि 42 फूट उंच झेंडा-स्तंभासाठी प्रमाणबद्ध करण्यात आला आहे. शुभ मुहूर्तानुसार पंतप्रधान मोदी सकाळी 11:52 ते 12:35 या वेळेत ध्वजारोहण करतील.सध्या मंदिरात शरद ऋतूचं वेळापत्रक लागू आहे. त्यानुसार मंगला आरती सकाळी 4:30 वाजता, श्रृंगार आरती 6:30 वाजता आणि शयन आरती रात्री 9:30 वाजता होते. दुपारी 12:30 ते 1 वाजेपर्यंत मंदिरात मध्याह्न बंदी ठेवली जाते.

यज्ञानंतर होणार ध्वजारोहण

विशेष आमंत्रित सदस्य गोपाल राव यांनी सांगितले की मागील चार दिवसांपासून यज्ञमंडपात 100 पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हवन सुरू आहे. विविध विधींमध्ये 30 जण सहभागी आहेत. उद्या राम-जानकी विवाहाचा कार्यक्रम आणि सांस्कृतिक सोहळाही पार पडणार आहे. यंदा प्रतीकात्मक साजरा केला जाणारा हा कार्यक्रम पुढील वर्षी अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.अयोध्येतील हा ऐतिहासिक सोहळा देशभरातील लाखो रामभक्तांसाठी आस्था, भावविश्व आणि पूर्णत्वाचा एक सुवर्णक्षण ठरणार आहे.

सोहळ्यात 7 ते 8 हजार भक्तांची उपस्थिती

श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की हा फक्त उत्सव नाही, तर प्रभू श्रीराम आपल्या योग्य स्थानावर विराजमान झाल्याचा प्रमाणिक सोहळा आहे. या ध्वजारोहणानंतर मंदिरात भजन आणि आरती आयोजित केली जाईल. समारंभासाठी 6 ते 8 हजार श्रद्धाळूंचं आमंत्रण देण्यात आलं आहे. रामायणातील निषाद आणि शबरी माता यांसारख्या विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींनाही निमंत्रण आहे. तसेच राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की ध्वजारोहण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. पूर्वांचलातील संत समाजालाही निमंत्रण देण्यात आले असून साधारण सात हजार भक्त सहभागी होतील.

पंतप्रधानांवर स्तुतिसुमने

गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, पंतप्रधान देशाचे प्रमुख असू शकतात, पण ते मुळात संघाचे एक समर्पित प्रचारक आहेत. त्यांचा हेतू स्पष्ट होता राम मंदिर व्हायला हवे, आणि त्यांनी हे कार्य पूर्ण केले. मंदिर उभारणीमुळे अयोध्येची संपूर्ण अर्थव्यवस्था बदलली आहे, आणि ज्यांनी मंदिराच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, त्यांना हे ठोस उत्तर असल्याचे त्यांनी सांगितले.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande