
सोलापूर, 25 नोव्हेंबर, (हिं.स.) - महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड रा. सासुरे, ता. बार्शी हिची बार्शी सत्र न्यायालयाने जामीनवर मुक्तता केली.दि. ९/९/२०२५ रोजी लुखा मसला, ता. गेवराई, बीड चे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या सासुरे येथील घरासमोर स्वत:च्या अलिशान गाडीत रिव्हॉलवारने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत मयताचे मेव्हणे लक्ष्मण चव्हाण (रा. नंदापूर,ता. जालना) यांनी वैराग पोलीस ठाण्यात नर्तिका पुजा गायकवाड हिच्या विरोधात फिर्याद नोंदवली होती.
नर्तिका पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्यासोबत कला केंद्रात झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन प्रेम संबंध ठेवले, गोविंद यांच्याकडून वेळोवेळी पैसे सोने नाणे घेतले, तसेच स्वतःच्या मावशीच्या व नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमिनी घेतल्या, भावाच्या नावावर ५ एकर शेती करण्याचा किंवा गेवराईतील नवीन घर नावावर कर नाहीतर तुझ्याशी बोलणार नाही, तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, पैसे देण्याकरिता वारंवार तगादा लावला त्यामुळे मेव्हणे गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड हिच्या सततच्या त्रासाला कंटाळून स्वतःच्या रिव्हॉलवारने डोक्यात कानाजवळ गोळी मारून घेऊन आत्महत्या केली असा आरोप फिर्यादीत केला होता. या प्रकरणी वैराग पोलिसांनी नर्तिका पुजा गायकवाड हिला अटक केलेली होती.
अटकेनंतर नर्तिका पूजा गायकवाड हिने बार्शी सत्र न्यायालयात ॲड. धनंजय माने यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी वेळी आरोपीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी आपल्या युक्तिवादात पूजा गायकवाड हिला या प्रकरणात केवळ संशयावरून गुंतवलेले आहे, मयताने आत्महत्येपुर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही, सदर केसचा तपास पुर्ण झालेला आहे, अशा परिस्थितीत महिला आरोपीला कारागृहात डांबुन ठेवून काहीही साध्य होणार नाही याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने आरोपी पुजा गायकवाड हिची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड