
मुंबई, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय 26 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत ग्राहक किंमत निर्देशांक ( सीपीआय), स्थूल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक( आयआयपी) यांच्या आधारभूत सुधारणांबाबत प्रकाशनपूर्व सल्लागार कार्यशाळा आयोजित करत आहे.
या कार्यशाळेचा प्राथमिक उद्देश सहभागींकडून अभिप्राय आणि सूचना मिळवण्यासाठी जीडीपी, सीपीआय आणि आयआयपीच्या सध्याच्या आधारभूत सुधारणांमधील प्रस्तावित पद्धतशीर आणि संरचनात्मक बदल सामायिक करणे हा आहे. या कार्यशाळेत या निर्देशांकांच्या संकलनात वापरण्यासाठी प्रस्तावित नवीन डेटा स्रोत आणि तंत्रज्ञानाची देखील माहिती दिली जाईल.
या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील सहभागी एकत्र येणार असून त्यामध्ये जागतिक बँक आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था, भारतीय रिझर्व्ह बँकचे प्रतिनिधी, प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, वित्तीय संस्था आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ञ, विषय तज्ञ, मुख्य सांख्यिकीचे वापरकर्ते आणि केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असेल. या विविध गटाच्या सहभागामुळे चर्चा अधिक समृद्ध होईल आणि वापरकर्त्यांना सुधारित मालिकेतील बदलांशी ओळख करून दिली जाईल अशी अपेक्षा आहे.
कार्यशाळा दिवसाची सुरुवात उद्घाटन सत्रामध्ये ईएसी-पीएमचे अध्यक्ष प्रा . एस. महेंद्र देव, आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर डॉ. पूनम गुप्ता, सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग आणि केंद्रीय सांख्यिकी महासंचालक एन. के. संतोषी यांच्या संबोधनाने होईल. त्यानंतर जीडीपी, सीपीआय आणि आयआयपीवरील तांत्रिक सत्रे आणि खुली चर्चा होईल.
या निर्देशांकांच्या मूलभूत सुधारणांमध्ये प्रस्तावित बदलांवरील संक्षिप्त संकल्पना असलेली एक पुस्तिका देखील सहभागींसोबत सामायिक केली जाईल. जीडीपी, सीपीआय आणि आयआयपीच्या सुधारित मालिकेच्या प्रकाशनापूर्वी पारदर्शकता मजबूत करणे, माहितीपूर्ण संवाद वाढवणे आणि व्यापक सल्लामसलत सुनिश्चित करणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. या महत्त्वाच्या सल्लागार प्रक्रियेत सर्व हितधारकांच्या सक्रिय सहभागाचे आणि सूचनांचे मंत्रालय स्वागत करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule