
नाशिक, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। कला शाखेतील बनावट पदवी प्रमाणपत्र व शैक्षणिक कागदपत्रे सादर करून महानिर्मिती कंपनीत अनुकंपा तत्त्वावर लिपिकपदाची नोकरी मिळवून आर्थिक नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी एका लिपिक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरा, नाशिकरोड येथील कार्यालयाचे मुख्य अभियंता इम्रान युसूफ खान यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की आरोपी मंजूषा प्रदीप स्वर्गे (वय ५७, रा. एकलहरा कॉलनी, नाशिकरोड) यांनी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळविण्यासाठी सादर केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्याकरिता कानपूर (उत्तर प्रदेश) येथील छत्रपती शाहू महाराज विश्वविद्यालयाच्या कार्यालयाकडे दि. २४ ऑक्टोबर रोजी पत्र पाठविले होते. त्यानुसार शाहू महाराज विद्यालयाच्या दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या या कार्यालयास अहवाल प्राप्त झाला. आरोपी मंजूषा स्वर्गे यांनी निम्नस्तर लिपिक यांनी कानपूर येथे छत्रपती शाहू महाराज विश्वविद्यालयातील कला शाखेचे पदवी प्रमाणपत्र हे बनावट शैक्षणिक कागदपत्र सादर करून महानिर्मिती कंपनीत नोकरी मिळवून महानिर्मिती कंपनीची फसवणूक केली असून, कंपनीचे आर्थिक नुकसान केले आहे. हा प्रकार दि. १७ जून २०१५ ते दि. २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एकलहरा औष्णिक विद्युत केद्रात घडला.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मंजूषा स्वर्गे या लिपिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV