
रायगड, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। पळस्पे फाटा येथील दि मार्टमध्ये कॅश ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचारीने ग्राहक कॅश रिटर्न रजिस्टरमधून ७,०६८ रुपयांची रोख रक्कम चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डीमार्टच्या स्टोअर मॅनेजर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
स्टोअर व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना परत द्यावयाच्या रकमेचे नोंदवही असलेल्या ‘कस्टमर कॅश रिटर्न रजिस्टर’मधील रकमेत विसंगती आढळल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर अंतर्गत चौकशी करण्यात आली असता संबंधित महिला कॅश ऑफिसरने पैसे अपहार केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले.
घटनेची माहिती मिळताच स्टोअर मॅनेजर यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम ३८० अन्वये गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज, रजिस्टरची नोंद आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी करून आरोपी महिलेची चौकशी पुढील काही तासांत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.डीमार्टसारख्या मोठ्या रिटेल चेनमध्ये घडलेली ही रोकड चोरीची घटना ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा विषय ठरत आहे. आर्थिक व्यवहार हाताळताना अधिक जबाबदारी आणि पारदर्शकतेची अपेक्षा असताना अशा प्रकारची घटना घडल्याने स्टोअर व्यवस्थापनाने सुरक्षाव्यवस्थेत आणखी कडक उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत.पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत असून, आरोपी महिलेवर योग्य ती कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके