


नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : भारताच्या वेगाने वाढत असलेल्या जहाजबांधणी उद्योगातील प्रचंड क्षमतेचा उपयोग करण्याचे तसेच पुढील पिढीतील सागरी क्षमता सह-विकसित करण्याचे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आंतरराष्ट्रीय भागीदारांना केले. शाश्वत तंत्रज्ञान, लवचिक पुरवठा साखळी आणि सुरक्षित भविष्याची उभारणी या माध्यमातून शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. संरक्षण उत्पादन विभागाने आयोजित केलेल्या आणि भारतीय जहाजबांधणी यार्डची क्षमता प्रदर्शित करणाऱ्या ‘समुद्र उत्कर्ष’ या परिसंवादात ते बोलत होते.
संरक्षणमंत्री म्हणाले की, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खाजगी उद्योग यांच्या प्रभावी संमिश्र संरचनेने भारतीय जहाजबांधणी उद्योग देशाच्या प्रादेशिक आणि जागतिक हितांचे रक्षण करत आहे. “भारत आता केवळ जहाजांची नव्हे, तर विश्वासाची निर्मिती करत आहे; केवळ प्लॅटफॉर्म्स नव्हे तर भागीदारी उभारून सागरी शतकाला आकार देण्यास सज्ज आहे,” असे ते म्हणाले.
एमएसएमईंच्या सहभागामुळे तयार झालेल्या मजबूत मूल्य साखळीवर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, पोलाद, प्रणोदन तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सर्स आणि प्रगत लढाऊ प्रणाली यांसह जगातील सर्वोत्तम क्षमतांचा समावेश भारतीय जहाजबांधणी परिसंस्थेत आहे. जागतिक दर्जाच्या अनेक प्लॅटफॉर्म्समुळे भारतीय उद्योगाची तांत्रिक परिपक्वता अधोरेखित होते, असेही त्यांनी म्हटले.
उच्च क्षमतेची प्रवासी व मालवाहू जहाजे, किनारी वाहतूक नौका, प्रदूषण नियंत्रण जहाजे, संशोधनासाठीची विशेष जहाजे आणि खोल समुद्रातील खाणकामासाठी इस्रो व राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेसाठी विकसित होणारी प्रगत वाहने या क्षेत्रात भारताची क्षमता वेगाने वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“विमानवाहू नौका, संशोधन जहाजे आणि ऊर्जा-कार्यक्षम व्यापारी जहाजे निर्माण करण्याची क्षमता भारताने प्राप्त केली आहे. त्यामुळे आगामी दशकात भारत जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि सागरी नवोन्मेषांचे जागतिक केंद्र होण्याची क्षमता बाळगतो,” असे संरक्षणमंत्री म्हणाले.
भारतीय नौदल आणि तटरक्षक दलासाठी सध्या बांधली जात असलेली सर्व जहाजे देशातीलच यार्डमध्ये तयार होत असल्याने ‘आत्मनिर्भर भारत’ दृष्टिकोनाची ही ठोस प्रचीती असल्याचे त्यांनी सांगितले. 262 स्वदेशी नौदल प्रकल्प प्रगत टप्प्यात असल्याची माहितीही त्यांनी दिली. व्यापारी जहाजांचा ताफा देखील संपूर्णपणे देशातच बांधला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय जहाजबांधणी यार्ड देशाच्या वाढत्या नील अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ असल्याचे सांगून संरक्षणमंत्र्यांनी माहिती दिली की, सागरी संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन, समुद्री परिसंस्थेची देखरेख, मत्स्यपालनाचा सुयोग्य वापर आणि विस्तीर्ण किनारपट्टीवरील सागरी कायद्याची अंमलबजावणी यासाठी अनेक विशेष जहाजे विकसित केली जात आहेत.-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule