
मुंबई, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। ५६व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजेच 'इफ्फी' सध्या गोव्यात मोठ्या दिमाखात सुरू आहे. भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार-तंत्रज्ञांच्या उपस्थितीमुळे 'इफ्फी'ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. देश-विदेशांतील विविध भाषांमधील चित्रपटांसोबत महाराष्ट्राच्या लाल मातीतील मराठी चित्रपटही जगभरातील सिनेप्रेमी आणि समीक्षकांवर मोहिनी घालत आहेत. यामध्ये 'दृश्य-अदृश्य' या आगळ्यावेगळ्या विषयावर आधारलेल्या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांवर जणू जादू केली आहे. नुकतेच 'इफ्फी'मध्ये झालेल्या 'दृश्य-अदृश्य' चित्रपटाच्या शोला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कौतुक केले.
आरएसटी कॅनव्हास निर्मित आणि मिलिंद लेले दिग्दर्शित ‘दृश्य-अदृश्य’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची निवड प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी झाल्यापासून सगळीकडे या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वर्खडे, दत्ताजी थोरात, धनंजय थोरात, पृथ्वीराज खेडकर, युवराज खेडकर आणि अश्विनी खेडकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मिलिंद लेले यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'इफ्फी'मध्ये 'दृश्य-अदृश्य'ची निवड होण्याचा क्षण मराठी सिनेसृष्टी, कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी अभिमानाचा ठरला आहे. मराठीपासून हिंदीपर्यंत अभिनयाचा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री पूजा सावंतने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. पूजाने साकारलेल्या व्यक्तिरेखेचे इफ्फीमध्ये खूप कौतुक झाले. चित्रपटाचा शो संपल्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून चित्रपटाच्या संपूर्ण टिमचे अभिनंदन केले आणि चित्रपट आवडल्याची पोचपावती दिली. इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा या विभागात हा चित्रपट दाखविण्यात आला. इफ्फीमध्ये 'दृश्य-अदृश्य' चित्रपटाचे चार वेळा स्क्रिनींग करण्यात आले आणि प्रत्येक वेळी रसिकांनी भरभरून दाद दिली.
आशयघन पटकथा, प्रसंगानुरुप सादरीकरण, अर्थपूर्ण संवाद, कथानकाला पोषक वातावरणनिर्मिती, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय आणि दिग्दर्शक मिलिंद लेले यांचे संवेदनशील दिग्दर्शन प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारे ठरले. ‘दृश्य-अदृश्य’ हा मानवी मनाच्या गूढ गाभ्यापर्यंत नेणारा एक रहस्य आणि भावनांच्या संगमातून जन्मलेला चित्रपट आहे. आपल्या डोळ्यांना दिसणारे आणि सत्य यांच्या संभ्रमात गुरफटवून ठेवणारी पटकथा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी आहे. वास्तव आणि भ्रम याच्यातील सीमारेषा धूसर होत गेल्या की सत्याचे ‘दृश्य’ किती ‘अदृश्य’ होते, हे या चित्रपटात प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. पूजा सावंतच्या जोडीला या चित्रपटात अशोक समर्थ, हार्दिक जोशी आणि अक्षया गुरव आदी लोकप्रिय कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर