
धर्मेंद्र वैशिष्टपूर्ण आणि विलक्षण व्यक्तिमत्वाचे धनी होते : राहुल रवैल
पणजी, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. धर्मेंद्र सर्वात प्रिय आणि विलक्षण व्यक्तिमत्वाचे धनी होते. सोमवारी दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी त्यांचे निधन झाले. सध्या गोवा इथे सुरू असलेल्या 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) देशभरातून आलेल्या चित्रपट रसिकांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. महोत्सवामध्ये आज या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते राहुल रवैल यांनी यावेळी अभिनेते धर्मेंद्र यांच्याविषयीच्या भावनिक आठवणी व्यक्त केल्या. रुपेरी पडद्यातील सर्वात तेजस्वी तार्यांपैकी एक असलेल्या त्यांच्या विविध स्मृतींना यावेळी उजाळा दिला. धर्मेंद्र यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबाला किती अपार दुःख सहन करावे लागत असेल याची कल्पना केलेली बरी असे सांगून रवैल म्हणाले, ते एक वैशिष्टपूर्ण आणि विलक्षण अभिनेते होते, तसेच एक अपवादात्मक माणूस होते.’’
राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून धर्मेंद्र यांच्याबरोबर काम करताना अनुभवलेले दिवसांचे स्मरण करून, रवैल यांनी सांगितले की स्वर्गीय धर्मेंद्र यांनी ट्रॅपीझ कलाकार महेंद्र कुमार ही अतुलनीय समर्पणाने भूमिका साकारली. त्यांनी सांगितले की, हा अभिनेता महिनाभर दररोज संध्याकाळी विमानाने दिल्लीला जायचा, सकाळी ५ वाजेपर्यंत शूटिंग करायचा आणि नंतर मुंबईला परत येूवन ते 'आदमी और इन्सान' या चित्रपटाचे चित्रीकरण करीत होते. अतिशय अवघड वेळापत्रक त्यांनी कसोशीने पाळत होते.
राहुल रवैल यांनी 'बेताब' (१९८३) च्या चित्रीकरणाची आठवणही यावेळी सांगितली. ‘बेताब’ चित्रपटामध्ये धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल पहिल्यांदाच काम करीत होता. काश्मीरमध्ये चित्रीकरण करताना, स्वर्गीय धर्मेंद्र यांची एक झलक पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमायचे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, अनेक दिवस दररोज संध्याकाळी वांद्रे पश्चिम मधल्या एका सिनेमागृहामध्ये त्यांच्या मुलाचा पहिला चित्रपट पहायला जायचे. एकदा धर्मेंद्र यांनी दिग्दर्शक राहुल रवैल यांच्या घरी जाऊन सनीच्या ‘बेताब’ चित्रपटाबद्दल चर्चा केली. त्यांच्या बोलण्यात खूप उत्साह होता. आपण तो चित्रपट पहिल्यांदाच पाहिला आहे, इतके ते भरभरून सिनेमाविषयी बोलत होते. रवैल यांनी अभिमानाने असेही नमूद केले की, या महान अभिनेत्याची मुले त्यांचा 'महान वारसा' पुढे नेत आहेत.
धर्मजी एक असे व्यक्ती होते की, त्यांचे जीवन साजरे केले पाहिजे, कारण त्यांनी लोकांना खूप आनंद दिला, असे ते भावूक उद्गार त्यांनी काढले. यावेळी त्यांनी दिल्लीतील एका पोलिस अधिकाऱ्याची कहाणी सांगितली. धर्मेंद्रला या अधिका-याला भेटायचे होते आणि त्यांच्या पायांना स्पर्श करायचा होता. आपल्या प्रिय नायकाचे निधन झाल्याचे कळताच, अधिकारी दुःखाने कोमेजले, त्यांनी रवैल यांना फोन केला आणि सनी देओल यांना भेटून त्यांचे सांत्वन करण्याची इच्छा व्यक्त केली. ही धरमजींची शक्ती आहे, असे रवैल म्हणाले.
आपल्या प्रारंभीच्या कारकिर्दीमध्ये धर्मेंद्र यांनीच आपले अगदी पित्याप्रमाणे पालनपोषण केले; प्रत्येक गोष्टीला पाठिंबा दिला, असे सांगून राहुल रवैल यांनी एक अद्भुत निर्माता म्हणून त्यांचे कौतुकही केले.
समारोपाच्या भाषणात ते म्हणाले, आपण एक महान माणूस गमावला आहे. धर्मेंद्रजींसारखे आयकॉन काम करत असताना आपण पाहिले आहे, म्हणजे आपण भाग्यवान आहोत. अशी भावना व्यक्त करून राहुल रवैल यांनी या कालातीत कलाकाराला सन्मानित करण्यासाठी विशेष श्रद्धांजली आयोजित केल्याबद्दल इफ्फी आयोजकांचे आभार मानले.
एक उत्तुंग व्यक्तिमत्व, एक लोकप्रिय कलाकार आणि अतुलनीय माणूस म्हणून - स्वर्गीय धर्मेंद्र यांचे नाव भारतीय चित्रपटसृष्टीच्या हृदयात कायमचे कोरले जाईल, असे मनोगत राहुल रवैल यांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule