
लातूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।
लातूर पोलिसांच्या विशेष पथकाने डारमंड फाईलमधील महत्त्वाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील 19 वर्षे फरार असलेल्या आरोपीला अखेर मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे.
हा आरोपी 2006 पासून पोलीस प्रशासन व न्यायालयास सतत गुंगारा देत असल्याने त्याचा शोध लागणे हे पोलीस दलासाठी मोठे आव्हान ठरले होते.
पोलीस स्टेशन गांधी चौक, गु.र.नं. 140/2006 कायदा : कलम 420, 468, 471 भादवि आरसीसी नं. 730/2006 डीएफ नं. 130/2018 मधील आरोपी रा. बोबळी (बु.), ता. देवणी, जि. लातूर याची विरुद्ध दि. 14/06/2006 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर तो पळून जाऊन सतत ठिकाण बदलत राहिल्याने तो सापडत नव्हता. तो गावोगाव फिरत राहून स्वतःला ग्रामपंचायत टाकळीचा सरपंच असल्याचे भासवून, बोगस जन्म दाखले तयार करून नागरिकांची फसवणूक करीत होता.“मी ग्रामपंचायत टाकळीचा सरपंच आहे” असे सांगून मुलांचे कोरे जन्मदाखले भरून, स्वतःचे बनावट स्वाक्षरी- शिक्के मारून बनावट दाखले दिले.
हे दाखले शाळेत दिल्यावर शिक्षकांनी संशय घेतला. आरोपीला विचारणा केल्यावर तो सरपंच नसल्याचे उघड झाले त्याने 29 मुलांचे बोगस जन्मदाखले तयार करून प्रत्येकी 40 ते 50 रुपये घेतले होते.
हे दाखले शाळांमध्ये पहिलीमध्ये प्रवेशासाठी वापरण्यात आले. त्या वेळी तपासिक पोउपनि सी.एम. गोरे यांनी सरपंच कार्यालयाचे शिक्के, हस्ताक्षर नमुने, बोगस फॉर्म आदी मुद्देमाल पंचनाम्यात जप्त केला होता.
विशेष पथकास आरोपी बोबळी (बु.) ता. देवणी भागात राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पथकाने छापा टाकला. कारवाईमध्ये आरोपी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन गांधी चौक येथे हजर करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis