
नांदेड, 25 नोव्हेंबर (हिं.स.)लोहा तालुक्यातील किरोडा शिवारात शेतात राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्यावर दरोडेखोरांनी जीवघेणा हल्ला चढविला. कुऱ्हाडीने मारहाण करून दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदू बारोळे (७०) आणि त्यांची पत्नी काळूबाई बारोळे (६५) हे शेतातच राहत होते. काही अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या घरात जबरदस्ती प्रवेश करून दोघांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दाम्पत्याला बेशुद्धावस्थेत सोडून दरोडेखोरांनी घरातील ४-५ तोळे सोन्याचे दागिने, चांदी तसेच सुमारे एक ते दीड लाख रुपयांची रोख रक्कम असा ऐवज घेऊन पोबारा केला.
मुलगा शेतात आल्यानंतर घटना उघडकीस आली. जखमी दाम्पत्याला तातडीने नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय अधिकारी अश्विनी जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय आणि लोहा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis