
नाशिक, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। तपोवनात कुंभमेळ्यासाठी 'साधुग्राम' उभारण्याच्या नावाखाली १,८०० हून अधिक झाडे तोडण्याच्या प्रशासकीय निर्णयाला खासदार राजाभाऊ वाजे यांनी कठोर शब्दांत विरोध केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतंत्र सविस्तर पत्र लिहून तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
प्रभू श्रीरामांनी वास्तव्य केलेला, ऋषी-मुनींनी तपश्चर्या केलेला हा पवित्र प्रदेश आहे. निसर्गाची कत्तल करून धार्मिक मेळा आयोजित करणे हा हिंदू संस्कृतीवरच आघात आहे,' असे ठळक विधान वाजे यांनी केले. खासदार वाजेंनी प्रश्न उपस्थित केला की, मागील सर्व सिंहस्थ मेळावे एकही झाड न तोडता यशस्वी झाले.
मग यंदा तपोवनच का? जिल्ह्यात हजारो एकर मोकळी जमीन असताना जाणीवपूर्वक संवेदनशील तपोवनाची निवड का केली? झाडतोड, साधुग्राम बांधकाम आणि पर्यायी वृक्षलागवड असे तीन स्वतंत्र टेंडर काढून सार्वजनिक निधीची उधळण आणि कुंभाच्या नावे 'मेवा' खाण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर संशयही त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV