''नेव्हरएव्हर'' : 26/11 स्मृती समारंभ व प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद, हल्ल्यातून बचावलेले आणि या हल्ल्यातील सर्व पिडीतांचे स्मरण करण्यासाठी, राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या, मुंबई पथकाच्या वतीने उद्या गेटवे ऑफ इंडिया येथे नेव्हरएव्हर अर्थात यापुढे
NeverEver 26/11


मुंबई, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद, हल्ल्यातून बचावलेले आणि या हल्ल्यातील सर्व पिडीतांचे स्मरण करण्यासाठी, राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या, मुंबई पथकाच्या वतीने उद्या गेटवे ऑफ इंडिया येथे नेव्हरएव्हर अर्थात यापुढे कधीच नाही या संकल्पनेवर आधारित एक स्मृती समारंभ आणि प्रतिज्ञा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमातून, अशा प्रकारचा हल्ला पुन्हा कधीही होऊ दिला जाणार नाही, हा सामूहिक संकल्प पुन्हा एकदा दृढतेने व्यक्त केला जाणार आहे.

यासाठी एक विशेष स्मृती क्षेत्र आखून, तिथे शूरवीरांची आणि हल्ल्यात मरण पावलेल्या सर्वांची छायाचित्रे आणि नावे प्रदर्शित केली जातील आणि, पुष्पांजली अर्पण केली जाईल तसेच, मेणबत्त्याही पेटवल्या जातील. श्रद्धांजलीसाठी अर्पण केलेल्या मेणबत्त्यांमधून तयार केलेला आणि भविष्यातील स्मारकांसाठी जतन केलेला एक स्मृतीस्तंभही उभारला जाईल. याव्यतिरिक्त, मुंबईतील 11 महाविद्यालये आणि 26 शाळांमधील विद्यार्थी ‘’नेव्हरएव्हर’’ या संकल्पनेअंतर्गत प्रतिज्ञा घेतील. या प्रतिज्ञेतून शांतता, दक्षता आणि राष्ट्रीय सुरक्षेप्रती युवा वर्गाची वचनबद्धता अधिक दृढ होईल.

कार्यक्रमाच्या ठिकाणी एक प्रतिज्ञा कक्ष आणि संदेश लिहिण्याची स्वतंत्र जागा असेल. इथे नागरिक प्रतिज्ञेत सहभागी होऊ शकतील आणि शहीद झालेल्या तसेच वाचलेल्या व्यक्तींसाठी संदेश लिहू शकतील. यासोबतच, या हल्ल्यातील वाचलेले लोक आणि शहीदांच्या कुटुंबियांचा सत्कार आणि निवडक दृकश्राव्य सादरीकरणाचा एक छोटेखानी कार्यक्रमही होईल. यानंतर मुंबई आणि देशाच्या चिरस्थायी धैर्य आणि संकल्पाचे प्रतीक म्हणून, अंधार पडू लागल्यानंतर गेटवे ऑफ इंडियाला तिरंग्याच्या रंगात आणि ‘‘नेव्हरएव्हर’’ या शब्दांच्या प्रकाशचित्रांनी व्यापले जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande