
मुंबई, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। वनप्लस कंपनी 17 डिसेंबर 2025 रोजी भारतात आपली बहुप्रतिक्षित वनप्लस १५आर ५जी स्मार्टफोन मालिका सादर करणार असून हा इव्हेंट भारतीय ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ‘व्हॅल्यू फॉर मनी’ कॅटेगरीतील हा नवा फोन वनप्लस 15 मालिकेचा महत्त्वाचा भाग असणार असून जागतिक पदार्पणानंतर अवघ्या काही दिवसांतच तो भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. या सोबतच कंपनी वनप्लस पॅड गो 2 टॅबलेट आणि त्यासोबतचा पॅड गो 2 स्टायलो स्टायलस पेनही लॉंच करणार आहे.
वनप्लस १५आर ५जी ची अधिकृत किंमत कंपनीकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी तज्ज्ञांच्या मते हा फोन सुमारे 44,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अप्पर-मिडरेंज सेगमेंटमधील आर-सीरिज नेहमीच दमदार फीचर्ससाठी ओळखली जाते. मागील मॉडेल वनप्लस 13आर च्या तुलनेत या फोनमध्ये हार्डवेअर आणि डिझाइनमध्ये मोठ्या सुधारणा अपेक्षित आहेत. हा फोन चारकोल ब्लॅक आणि मिंट ब्रीझ या दोन आकर्षक रंगांमध्ये लॉन्च होईल अशी माहिती समोर आली आहे.
स्पेसिफिकेशन्सबाबत समोर आलेल्या माहितीनुसार या फोनमध्ये फ्लॅट मेटल फ्रेमसह 165Hz रिफ्रेश रेट असलेला उच्च-गुणवत्तेचा OLED डिस्प्ले असेल. तसेच ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर मिळण्याची शक्यता आहे. परफॉर्मन्ससाठी क्वालकॉमचा नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसर वापरला जाईल अशी चर्चा आहे. बॅटरी विभागात 7,800mAh ची शक्तिशाली बॅटरी आणि फास्ट-चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. कॅमेर्यात ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार असून याची सविस्तर माहिती लॉंचवेळी जाहीर केली जाईल. टिकाऊपणाच्या बाबतीत हा फोन आयपी66, आयपी68, आयपी69 आणि आयपी69K अशी चार महत्त्वाची संरक्षण प्रमाणपत्रे घेऊन येणार आहे, ज्यामुळे पाणी, धूळ आणि हाई-प्रेशर वॉटर जेटपासून उत्कृष्ट सुरक्षा मिळेल.
या कार्यक्रमात वनप्लस पॅड गो 2 टॅबलेटही सादर करणार असून हा 2023 मध्ये आलेल्या पॅड गो चा उत्तराधिकारी असेल. अभ्यास, ऑफिस वर्क आणि मनोरंजनासाठी डिझाइन केलेल्या या टॅबलेटमध्ये Shadow Black आणि Lavender Drift असे दोन रंग पर्याय असतील. यापैकी फक्त Shadow Black व्हेरिएंटमध्ये 5G कनेक्टिव्हिटी दिली जाईल. कंपनी याचसोबत पॅड गो 2 स्टायलो नावाचा नवीन स्टायलस पेनही आणत आहे, जो नोट्स लिहिणे, स्केचिंग आणि क्रिएटिव्ह कामांसाठी उपयुक्त ठरणार आहे. टॅबलेट आणि स्टायलसची किंमत व संपूर्ण फीचर्स 17 डिसेंबरच्या इव्हेंटमध्ये जाहीर होतील.वनप्लसनं नेहमीच दमदार स्पेसिफिकेशन्स व परवडणाऱ्या किंमतीचा उत्तम मेळ साधला आहे आणि त्यामुळेच भारतीय ग्राहकांमध्ये या लॉंचबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule