
मुंबई, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। ओपनएआय कंपनीनं चॅटजीपीटीमध्ये ‘शॉपिंग रिसर्च’ नावाचं नवं आणि उपयुक्त वैशिष्ट्य सुरू केलं आहे. आता कोणत्याही वस्तूबाबत खरेदीसंबंधी माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाइट्सवर तासन्तास शोध घेण्याची गरज नाही. वापरकर्त्यानं फक्त त्याला हवी असलेली वस्तू, तिचा उपयोग किंवा बजेट याबाबत चॅटजीपीटीला सांगायचं आणि उर्वरित संपूर्ण संशोधन चॅटजीपीटी करणार आहे. हे फीचर सर्व फ्री, प्रो, प्लस आणि गो प्लॅन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे.
ओपनएआयनं आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये सांगितलं की, वापरकर्ते “छोट्या अपार्टमेंटसाठी शांत कॉर्डलेस स्टिक व्हॅक्यूम शोधा”, “या तीन सायकल्समधून कोणती निवडावी”, किंवा “कला आवडणाऱ्या चार वर्षांच्या भाचीसाठी गिफ्ट सुचवा” अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात आणि चॅटजीपीटी त्यांना विचारपूर्वक, सखोल मार्गदर्शन देणार आहे. हे फीचर किंमत, खास वैशिष्ट्ये, गरजेनुसार योग्य पर्याय, दोन किंवा अधिक प्रॉडक्ट्समधील फरक, त्यांचे फायदे-तोटे अशा सर्व बाबींवर माहिती देऊ शकतं. काहीवेळा तुलना आणि विस्तृत तपशील तयार करण्यास थोडा वेळ लागू शकतो, परंतु उत्तर अत्यंत माहितीपूर्ण मिळणार आहे.
तथापि, किंमत किंवा उपलब्धतेबाबतची माहिती कधीकधी अचूक नसेल, असा महत्त्वाचा खुलासा कंपनीनं केला आहे. त्यामुळे अंतिम खरेदीपूर्वी संबंधित दुकानाच्या अधिकृत वेबसाइटवर तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स, ब्यूटी, होम अँड गार्डन, किचन अँड अप्लायन्सेस, स्पोर्ट्स अँड आउटडोअर या श्रेणींमध्ये ‘शॉपिंग रिसर्च’ सर्वाधिक प्रभावीपणे काम करत असल्याचं ओपनएआयनं नमूद केलं. आगामी काळात ‘इन्स्टंट चेकआऊट’ सुविधेद्वारे थेट चॅटजीपीटीमधून खरेदी करण्याचं स्वप्नही प्रत्यक्षात येणार आहे. ही सुविधा सप्टेंबरमध्ये सुरू झाली असून हॉलिडे सीझनच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना अधिक सोपी, जलद आणि स्मार्ट खरेदीचा अनुभव देणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule