अयोध्या : कडेकोट सुरक्षेमध्ये पंतप्रधानांचा रोड-शो
अयोध्या, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : रामजन्मभूमीवरील श्रीराम मंदिराच्या ध्वजारोहणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी सकाळी 9.35 वाजता अयोध्येला पोहचले. यावेळी साकेत महाविद्यालय परिसरात पंतप्रधानांनी रोड-शो केला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या अ
पंतप्रधान रोड-शो अयोध्या


अयोध्या, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : रामजन्मभूमीवरील श्रीराम मंदिराच्या ध्वजारोहणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी सकाळी 9.35 वाजता अयोध्येला पोहचले. यावेळी साकेत महाविद्यालय परिसरात पंतप्रधानांनी रोड-शो केला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांना त्यांनी अभिवादन केले. तर नागरिकांकडून पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

पंतप्रधान मोदी मंगळवारी सकाळी 9.35 वाजता विमानतळावर उतरले आणि 9.50 वाजता साकेत महाविद्यालयात पोहोचले. ध्वजारोहणाचा शुभमुहूर्त दुपारी 11.58 ते 12.30 या वेळेत नियोजित आहे. राममंदिरावर फडकवली जाणारी ध्वजा 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद आहे. पंतप्रधानांच्या रोड शोसाठी साकेत महाविद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. ध्वजारोहण समारंभासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची अभेद्य व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण अयोध्या सील करून प्रत्येक ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्याच्या सीमाही आधीपासूनच बंद करण्यात आल्या होत्या. अयोध्या धामच्या प्रवेशद्वारांवर सोमवारी सकाळपासूनच बंदी लागू करण्यात आली असून, पासशिवाय कोणालाही प्रवेश नव्हता.

त्यासोबतच रामपथाशी जोडलेल्या सर्व गल्लीबोळांना सील केले होते. रोड शोच्या मार्गावरील दोन्ही बाजूंच्या घरांच्या छतांवर सशस्त्र जवान तैनात होते. ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालीवर लक्ष होते. पंतप्रधानांसाठी 5 स्तरांचे सुरक्षा कवच उभारण्यासाठी एटीएस आणि एनएसजीचे सुमारे 600 कमांडो तैनात केले होते. यासंदर्भात एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर यांनी सांगितले की, मजबूत सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. नयाघाटवरील फ्लोटिंग कंट्रोल रूममधून जलमार्गावरदेखील देखरेख ठेवली जात आहे. जिओ-फेन्सिंगच्या माध्यमातून या मार्गावरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास 22 महिन्यांनंतर पुन्हा एकदा रामलल्लांच्या उपस्थितीत असतील. राममंदिराच्या निर्माणसंकल्पाच्या पूर्णतेसाठी ‘राम काज कीन्हें बिनु मोहिं कहा विश्राम’ या उद्घोषासह, कोरोना साथरोगाच्याच्या काळात 5 ऑगस्ट 2020 रोजी मंदिरनिर्माणाची भूमिपूजन विधी करून कामाची सुरुवात केली होती. त्यानंतर 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande