“शतकानुशतके चालत आलेल्या वेदनांना विराम” – पंतप्रधान
अयोध्या, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : राम भक्तांच्या शतकानुशतके चालत आलेल्या वेदनांना आज, विराम मिळाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या कळसावर आज, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते धर्मध्वजेचे आ
नरेंद्र मोदी, पंतप्रधान


अयोध्या, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : राम भक्तांच्या शतकानुशतके चालत आलेल्या वेदनांना आज, विराम मिळाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या कळसावर आज, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते धर्मध्वजेचे आरोहण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “ मंदिर निर्माणाच्या संकल्पपूर्तीमुळे आज शतकानुशतकांच्या वेदनांना विराम मिळाला आहे. अयोध्या नगरी आज भारताच्या सांस्कृतिक चेतनेच्या आणखी एका अद्वितीय शिखरबिंदूची साक्षीदार ठरत आहे. भगवा ध्वजाच्या प्रतीकात्मक महत्त्वाचा उल्लेख करताना सांगितले की भगवा रंग सूर्यवंशीय परंपरेचे प्रतीक असून हा धर्मध्वज मंदिरात येऊ न शकणाऱ्या भक्तांनाही आध्यात्मिक पुण्याची अनुभूती देणारा ठरेल. त्यांनी देश-विदेशातील कोट्यवधी रामभक्तांना तसेच मंदिराच्या बांधकामात योगदान देणाऱ्या प्रत्येक श्रमिक, कारीगर, शिल्पकार आणि वास्तुकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

आपण असे समाज घडवूया, जिथे कोणी गरीब नसेल, कोणी पीडित नसेल. धर्मध्वज युगानुयुगे श्रीरामांच्या आदर्शांचे प्रेरणास्त्रोत राहील. राममंदिरासाठी दान देणाऱ्या प्रत्येक दानवीर आणि श्रमवीरांचे मोदींनी अभिनंदन केले.

अयोध्येत उभारलेल्या सप्तमंदिरांची, निषादराजांच्या मंदिराची तसेच जटायू आणि गिलहरीच्या प्रतिकात्मक मूर्तींचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की हे सर्व मोठ्या संकल्पाप्रती छोट्या-छोट्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करतात. “राम को शक्ति नहीं, सहयोग महान लगता है,” असे सांगत त्यांनी समाजाच्या सामूहिक शक्तीला विकसित भारताच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक ठरवले.

पंतप्रधानांनी 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्याची आवश्यकता अधोरेखित करताना भावी पिढ्यांच्या दृष्टीने दूरदृष्टीने कार्य करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, हा देश आमच्या पूर्वीही होता आणि आमच्या पश्चातही राहिल. रामाच्या आदर्शांचे वर्णन करताना त्यांनी स्पष्ट केले की राम म्हणजे विवेक, कोमलतेतील दृढता, सत्याचा अडिग संकल्प आणि मर्यादा आणि “जर समाजाला सामर्थ्यवान बनवायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात रामाला जागवले पाहिजे.”या पुनर्प्रतिष्ठेच्या सोहळ्यामुळे अयोध्येने पुन्हा एक ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला असून, सनातन परंपरा आणि भारतीय सांस्कृतिक वारशाला नव्या वैभवाने उजाळा मिळाला आहे.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande