
अयोध्या, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : राम मंदिराचे बांधकाम त्यांच्या ‘स्वप्नांहूनही अधिक सुंदर’ झाले असून हे भारतीय संस्कृतीचे विलक्षण प्रतीक आहे. त्यांनी मंदिरनिर्मितीशी संबंधित प्रत्येक कार्यकर्त्याचे अभिनंदन करताना हे स्मारक राष्ट्रीय एकतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. अयोध्येतील मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. याप्रसंगी राम दरबारात दर्शन-पूजन, आरती आणि विधिवत पूजा-अर्चना केली. पुजार्यांनी तीनही मान्यवरांना रामनामी गमछा अर्पण करून प्रसाद दिला.
याप्रसंगी सरसंघचालकांनी अनेक ऐतिहासिक व्यक्तींचा उल्लेख केला. आज अशोक सिंघल, रामचंद्र दास महाराज आणि डालमिया यांसारख्या अनेकांना शांती लाभली असेल. मंदिरनिर्मितीची शास्त्रशुद्ध प्रक्रिया पूर्णत्वाला आली आहे. रामध्वज, जो कधीकाळी संपूर्ण जगात सुख-शांतीचा संदेश देत होता, त्याला पुन्हा एकदा आपल्या शिखरावर आरूढ होताना पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याचे ते म्हणाले. ध्वजावरील प्रतीकांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की भगव्या ध्वजावरील कोविदार वृक्ष रघुकुलाच्या सत्ता व संरक्षणपर परंपरेचे प्रतीक आहे, तर सूर्यदेव संकल्प, तेज आणि धर्मनिष्ठतेचे द्योतक आहेत.भागवत म्हणाले, “हिंदू समाजाने पाच शतकांच्या संघर्षात आपले धैर्य, समर्पण आणि ओनरशिप सिद्ध केली. आज रामलला पुनः आपल्या मंदिरात विराजमान झाले. आता आपले ध्येय एक असे भारत घडविण्याचे आहे जो जगाला सत्यावर आधारित ‘धर्म’ व ज्ञान देईल. ही प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ती अधिक वेगाने पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे.
जागतिक पातळीवरील भारतीय भूमिकेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, जगताला अशा भारताची अपेक्षा आहे जो शांती, समृद्धी आणि विकासाचा मार्ग दाखवेल.
भागवतांनी एकजुटीची गरज अधोरेखित करताना आवाहन केले “श्रीरामलला स्मरण करून आपण सर्वांनी एकत्रितपणे पुढील प्रवास अधिक वेगाने सुरू करूया.अखेरच्या शब्दांत त्यांनी मंदिरातून मिळणारी प्रेरणा जपत राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी