
पुणे, 25 नोव्हेंबर, (हिं.स.) - गुंड शरद मोहोळ आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनासह मागील पाच वर्षांत झालेल्या गुन्ह्यांत मध्य प्रदेशातील उमरटी गावात बनवण्यात येणाऱ्या गावठी पिस्तुलचा वापर करण्यात आला होता.
पुण्यासह महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड भागात असे 700 ते 800 शस्त्रे पुरवण्यात आली होती. गरज पडल्यास पुन्हा त्या गावात घुसून कारवाई केली जाईल, असा इशारा पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिला.
केवळ कारवाई करून थांबणार नाही, तर त्यांची पुरवठा साखळीही मोडून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सहायक पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, निखिल पिंगळे उपस्थित होते. या कारवाईत सहभागी 150 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु