
वॉशिंग्टन , 25 नोव्हेंबर (हिं.स.)।एच-1बी व्हिसावर कडक भूमिका घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसाच्या अटी एका रात्रीत बदलल्या.यावर आता व्हाइट हाऊसने एच-1बी व्हिसाबाबत ट्रम्प यांची भूमिका स्पष्ट केली आहे. व्हाइट हाऊसचे म्हणणे आहे की एच-1बी वर ट्रम्प यांची भूमिका पूर्णपणे सामान्य आणि ‘अमेरिका फर्स्ट’ या तत्त्वावर आधारित आहे.
व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांच्या मते ट्रम्प अमेरिकनांच्या नोकऱ्या हिरावल्या जाणे किंवा त्यांच्या जागी परदेशी कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाणे हे अजिबात इच्छित नाहीत. अनेक ठिकाणी अमेरिकन कर्मचाऱ्यांना एच-1बी कर्मचाऱ्यांनी रिप्लेस केले जात होते, त्यामुळे ट्रम्प यांना कठोर पावले उचलावी लागली.
कॅरोलिन लेविट म्हणाल्या, “ एच-1बी विषयी ट्रम्प यांची भूमिका सामान्य आहे. जर एखादी विदेशी कंपनी अमेरिकेत अब्जावधींचे गुंतवणूक करत असेल आणि सुरुवातीला स्वतःचे कर्मचारी बाहेरून आणत असेल, तर ते काही प्रमाणात ठीक आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की कंपनी पूर्णपणे स्थिरावल्यानंतर ट्रम्प यांची इच्छा आहे की तेथे अमेरिकन नागरिकांनाच प्राधान्याने नोकरी दिली जावी. अमेरिकेत गुंतवणूक करणाऱ्या परदेशी कंपन्यांना ट्रम्प यांनी आवाहन केले आहे की अमेरिकन भूमीत व्यवसाय करत असाल तर अमेरिकन कर्मचाऱ्यांनाच महत्त्व द्या. पण राष्ट्रपतींच्या या निर्णयाबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत.
लेविट यांनी सांगितले की, “टॅरिफ वाढविणे, इतर देशांशी व्यापार कमी करणे—हे सर्व निर्णय ह्याच विचारसरणीचा भाग आहेत. यामुळे अमेरिकेला अब्जावधींचा फायदा होत आहे आणि अनेक कंपन्या अमेरिकनांना चांगल्या पगारात नोकऱ्या देत आहेत.”
दरम्यान, ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसाची फी 1 लाख डॉलर (सुमारे 90 लाख रुपये) केली होती. नंतर ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले की ही वन-टाइम फी असेल आणि ती पुन्हा-पुन्हा भरावी लागणार नाही. तसेच जुने एच-1बी व्हिसाधारक यापासून वगळले जातील, असेही सांगितले गेले.
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी वाढली आहे. त्यामुळे स्पष्टीकरण देताना ट्रम्प म्हणाले की त्यांना कुशल परदेशी लोक अमेरिकेत यावेत, त्यांनी अमेरिकनांना नवीन कौशल्ये शिकवावीत, ज्यामुळे अमेरिकन नागरिकांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode