
वॉशिंग्टन, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की सोमवारी त्यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी फोनवर अत्यंत चांगली चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील युद्ध, फेंटेनाइलची तस्करी आणि शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या करारावर चर्चा केली.
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये लिहिले, “आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी एक उत्तम आणि अत्यंत महत्त्वाचा करार केला आहे. हा आणखी उत्तम होईल. चीनसोबत आमचे संबंध अत्यंत मजबूत आहेत.” ट्रम्प यांनी हेही सांगितले की त्यांनी एप्रिलमध्ये चीनच्या भेटीसाठी शी जिनपिंग यांच्या निमंत्रणाला स्वीकारले आहे आणि शी जिनपिंग वर्षाच्या अखेरीस अमेरिकेचा दौरा करतील. सुमारे महिनाभरापूर्वी डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची दक्षिण कोरियातील बुसान शहरात प्रत्यक्ष भेट झाली होती. संभाषणानंतर ट्रम्प म्हणाले, “चीनसोबत आमचे संबंध अत्यंत मजबूत आहेत.” ट्रम्प यांच्या मते, फोन कॉलदरम्यान फेंटेनाइल, सोयाबीन आणि इतर कृषी उत्पादनांवरही चर्चा झाली. त्यांनी म्हटले की “आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा करार केला आहे आणि तो आणखी चांगला होणार आहे.”
यापूर्वी चीननेही दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती दिली होती. चीनने सांगितले होते की दोन्ही नेत्यांनी व्यापार, तैवान आणि युक्रेन या विषयांवर चर्चा केली. चीनच्या मीडिया रिपोर्टनुसार,“शी जिनपिंग यांनी फोनवर ट्रम्प यांना म्हटले की तैवान द्वितीय महायुद्धानंतरच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे.”तसेच यावेळी त्यांनी युक्रेन युद्धावर न्याय्य व दीर्घकालीन शांततेची आशा व्यक्त केली.
अलीकडेच जपानच्या पंतप्रधान साने ताकैची यांनी असे विधान केले होते की जर चीनने तैवानविरुद्ध कारवाई केली, तर जपानी सैन्य हस्तक्षेप करू शकते. यानंतर चीन–जपान संबंधांमध्ये तणाव अधिक वाढला आहे. चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले की जपानने अशा टिप्पणीद्वारे लाल रेषा ओलांडली आहे.अमेरिका दीर्घकाळापासून तैवानच्या सार्वभौमत्वावर कोणताही स्पष्ट पक्ष घेत नाही, पण त्या बेटावर बलपूर्वक कब्जा करण्यास विरोध करतो. ट्रम्प प्रशासनाने अलीकडेच तैवानला 330 दशलक्ष डॉलरच्या शस्त्रविक्रीला मंजुरी दिली होती, ज्यावर बीजिंगने तीव्र आक्षेप नोंदवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode