
जळगाव, 3 नोव्हेंबर (हिं.स.) प्रभू श्रीरामचंद्राच्या जयजयकारात, वेदमंत्रोच्चारांच्या गजरात, टाळ-मृदुंग व ढोल-ताशांच्या निनादात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत १५३ वर्षांची परंपरा लाभलेल्या सुवर्णनगरी जळगाव ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे पारंपरिक थाटामाटात रथोत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण शहर जय श्रीरामच्या घोषात दुमदुमून गेले असून, भाविकांच्या चेहऱ्यावर भक्तिभावाचे तेज आणि समाधान स्पष्ट दिसत होते.
श्रीरामपेठेतील श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांच्या हस्ते श्रीराम रथाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर प्रभू श्रीरामांच्या उत्सवमूर्तीची पूजा करून ती रथावर विधीवत विराजमान करण्यात आली. आकर्षक पुष्पसजावटीने नटलेला रथ, त्यावर गरुड, मारुती, अर्जुन, दोन घोड्यांच्या मूर्तींनी सजलेला देखावा भाविकांसाठी पर्वणी ठरला. या मंगल प्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, भालचंद्र पाटील, प्रभाकर पाटील, विष्णू भंगाळे, सुनील खडके, पिंटू काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्रीराम रथाची मिरवणूक श्रीराम मंदिरातून निघून भोईटे गढी, आंबेडकर नगर, तेली चौक, रथचौक, बोहरागल्ली, सुभाष चौक मार्गे सराफ बाजारातील श्री महालक्ष्मी मंदिरापर्यंत गेली. तेथे भजनी मंडळांनी भावपूर्ण भजने सादर केली. पुढे मिरवणूक मरिमाता मंदिर, भिलपूरा मार्गे संत अप्पा महाराजांच्या परममित्र संत लालशाबाबा समाधीस्थळापर्यंत गेली, जिथे रामसेवकांनी चादर चढवून माल्यार्पण केले. शेवटी बालाजी मंदिर रथचौकात रथ पोहोचला आणि श्रीराम मूर्ती मंदिरात आणल्यानंतर महाआरतीने या पारंपरिक रथोत्सवाची सांगता करण्यात आली.
रथमार्गावर सर्वत्र भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी पाणी शिडकाव, फुलांची उधळण, कागदी पताकांची सजावट करून रथाचे स्वागत झाले. भाविकांनी रथासमोर पूजनासाठी गर्दी केली होती. “राजा राम जय श्रीराम”च्या घोषात परिसर दुमदुमला होता. मार्गावर विविध ठिकाणी साबुदाणा खिचडी, लस्सी, दुध, केळी यांचे वाटप करण्यात आले. रथोत्सवातील प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस कर्मचारी तसेच रामसेवकांकडून रथमार्गावर सुरळीत व्यवस्था पाहण्यात येत होती. गर्दीत साध्या वेशातील पोलिस वावरत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेण्यात आली. रथाच्या पुढे सजविलेल्या लहान मुलांच्या छोट्या रथांनी भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. लहान रामभक्त वाद्यांच्या तालावर श्रीरामाचा जयजयकार करत होते. भवानीचे सोंग घेतलेल्या कलाकारांनी देखील नृत्याद्वारे वातावरण अधिक रंगतदार केले. रथ आगमनापूर्वी महिलांनी अंगणात पाण्याचा शिडकावा करून आकर्षक रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या होत्या. मिरवणुकीत सनई-चौघडा, झेंडेकरी, वारकरी, भजनी मंडळ, मुक्ताबाई पादुका पालखी, तसेच फुलांनी सजविलेला रथ या साऱ्यांनी एक दिमाखदार, भक्तिरसाने ओथंबलेला देखावा निर्माण केला. जुन्या जळगाव भागात गृहिणी व तरुणींनी आरतीचे ताट, प्रसाद, फुलं घेऊन रथाचे औक्षण करत प्रभू श्रीरामाचे स्वागत केले.
-------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर