परभणीतील २६५ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ - मेघना साकोरे-बोर्डीकर
परभणी, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्य शासनाने अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी ‘स्मार्ट अंगणवाडी किट’ खरेदीस मान्यता दिली असून, या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील तब्बल २६५ अंगणवाड्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त ‘स्मार्ट अंगणवाड्यां’मध्ये रूपांतरित
मेघना बोर्डीकर


परभणी, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।

राज्य शासनाने अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी ‘स्मार्ट अंगणवाडी किट’ खरेदीस मान्यता दिली असून, या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील तब्बल २६५ अंगणवाड्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त ‘स्मार्ट अंगणवाड्यां’मध्ये रूपांतरित होणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, “मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य आणि पोषण या तिन्ही घटकांचा समन्वय साधणारी स्मार्ट अंगणवाडी ही एक नवी क्रांती ठरणार आहे. परभणी जिल्ह्यातील लहान मुलांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी शिक्षणाचे वातावरण मिळावे, यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरेल. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठीही ही योजना उपयुक्त ठरणार आहे.”

या योजनेद्वारे प्रत्येक अंगणवाडीत शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, स्वच्छता आणि बालसंगोपनासाठी आवश्यक असणारे आधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे मुलांसाठी आनंददायी आणि सुरक्षित शिक्षणाचे वातावरण निर्माण होणार असून, बालकांच्या वाढीचा, आरोग्याचा व पोषणस्थितीचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर होणार आहे.

या प्रकल्पात परभणी, सेलू, जिंतूर, पूर्णा, मानवत, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी व पालम या सर्व तालुक्यांतील अंगणवाड्या समाविष्ट आहेत. ग्रामीण भागातील बालकांना दर्जेदार शिक्षण, पोषण व आरोग्यसेवा मिळवून देणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे परभणी जिल्ह्यातील अंगणवाड्या आधुनिक शिक्षण आणि आरोग्यविकासाचे केंद्र म्हणून विकसित होतील. यामुळे ग्रामीण भागात बालकांच्या आरोग्य व शिक्षणवृद्धीसाठी नवे पर्व सुरू होईल, असा विश्वासही पालकमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

महिला व बालविकास विभाग राज्यभरातील अंगणवाड्या सुसज्ज, आकर्षक आणि कार्यक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, ‘स्मार्ट अंगणवाडी योजना’ ही बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाचे दूरदृष्टीचे पाऊल असल्याचेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande