
काबुल , 3 नोव्हेंबर (हिं.स.) अफगाणिस्तानमध्ये सोमवारी (दि.३) भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी नोंदवली गेली आहे. या भूकंपात किमान ७ जणांचा मृत्यू झाला आणि १५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे बल्ख प्रांताची राजधानी मजार-ए-शरीफ शहरात सर्वाधिक नुकसान झाल्याचे वृत्त आहे. समंगन प्रांताचेही मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या मजार-ए-शरीफ शहरात झालेल्या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे 28 किलोमीटर खोलीवर होते. स्थानिक वेळेनुसार हा भूकंप रविवारी रात्री 12 वाजून 59 मिनिटांनी झाला. या तीव्र भूकंपात किमान ७ जणांचा मृत्यू झाला असून १५० हुन अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृत आणि जखमी झालेल्यांपैकी बहुतेक समंगन प्रांतातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
बल्ख प्रांताचे प्रवक्ते हाजी जैद यांनी सांगितले की मजार-ए-शरीफमधील प्रसिद्ध “निळी मशीद” (ब्लू मशीद) चा एक भागही भूकंपात नुकसानग्रस्त झाला आहे. देशाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने म्हटले आहे की, मृत आणि जखमी तसेच झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल नंतर जाहीर केला जाईल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये बचाव कर्मचारी मलब्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना दिसत आहेत.
यूएसजीएसने त्यांच्या पेजर सिस्टमवर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, ही एक स्वयंचलित प्रणाली आहे जी भूकंपाच्या परिणामाची माहिती देते. पेजरवरून असं दिसून येतं की, मोठ्या संख्येने जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि आपत्ती व्यापक असण्याची शक्यता आहे.
यापूर्वी 31 ऑगस्ट 2025 रोजी, पूर्व अफगाणिस्तानात पाकिस्तान सीमेजवळ 6.0 तीव्रतेच्या भूकंपामुळे 2,200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 7 ऑक्टोबर 2023 रोजी 6.3 तीव्रतेच्या भूकंपानंतर आलेल्या तीव्र धक्क्यांमध्ये किमान 4,000 लोकांचा मृत्यू झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode