
अकोला, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यात एकीकडे पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यातच, अकोल्यात एका अल्पभूधारक शेतकऱ्याने केवळ सततची नापिकी आणि कर्जापोटी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन नाईक असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून विष प्राशन करून त्यांनी आपलं जीवन संपवलं.
अकोला तालुक्यातील दहिगाव गावंडे येथे गजानन नाईक राहात होते. मृत नाईक यांच्याकडे अडीच एकर शेती होती. त्यापैकी अर्धा एकर शेती त्यांनी कर्जापायी विकली होती.अतिवृष्टी व कर्जमुक्ती होत नसल्याच्या चिंतेमुळेच या शेतकऱ्यानं आत्महत्या केली असल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं आहे. नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून नाईक यांनी आत्महत्यासारखं टोकाचा पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलीय.
दरम्यान, गजानन नाईक या शेतकऱ्याने 26 ऑक्टोबर रोजी विष प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र आठ दिवसानंतर आज या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नाईक यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्र व खाजगी सावकारी कर्ज होते.. नाईक यांनी सलग दोन वर्ष ठोका पद्धतीने पंधरा एकर शेती केली होती. परिणामी त्या जमिनीमध्ये खर्च सुद्धा निघाला नाही आणि कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढत गेला उत्पन्न न झाल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचं बोलले जात आहे...
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे