
अकोला, 3 नोव्हेंबर (हिं.स.) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथील अधिष्ठाता (डीन) डॉ. संजय सोनुने यांच्या उद्धट वर्तनाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे,शहराध्यक्ष सौरभ भगत,उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले व मनविसे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ही तक्रार सादर केली. त्यांच्या मते, दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ते खासगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांविरोधात आणि बाह्यस्रोत मनुष्यबळ पुरवणाऱ्या स्मार्ट सर्व्हिसेस या कंपनीच्या गैरकारभारासंदर्भात निवेदन देण्यासाठी गेले होते.
मात्र, त्यावेळी डीन डॉ. संजय सोनुने यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार देत तुम्हाला जे करायचे आहे ते करा असे उद्धटपणे सांगून असभ्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांनी तक्रारदारांशी अपमानास्पद हातवारे करत दार बंद केले आणि मागील मार्गाने कार्यालयातून निघून गेले, असा उल्लेख तक्रारीत आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांनी ही वर्तणूक महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या कलम ३ व ४ चे उल्लंघन असल्याचे सांगत शिस्तभंगात्मक कारवाईची मागणी केली आहे.तक्रार प्राप्त झाल्यानंतर संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, मुंबई यांनी या प्रकरणाची चौकशी समिती नेमल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित समिती लवकरच घटनेची चौकशी करून अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले जात आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांनी चेतावणी दिली आहे की, १५ दिवसांत समाधानकारक कारवाई न झाल्यास ही बाब सरकारच्या तक्रार निवारण पोर्टल व मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत नेली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे