
रायगड, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त कैलास पगारे व विजय क्षीरसागर यांनी पेण, सुधागड आणि खालापूर तालुक्यांचा दौरा केला. प्रधानमंत्री जनजाती अभियान अंतर्गत विविध अंगणवाडी केंद्रांना भेट देत त्यांनी केंद्रांच्या कामकाजाची माहिती घेतली तसेच आदिवासी विकास विभागाच्या बहुउद्देशीय केंद्राला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
पेण तालुक्यातील मालवाडी येथील नव्याने उभारलेल्या अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन कैलास पगारे यांच्या हस्ते पार पडले. या वेळी लेक लाडकी योजना, मातृ वंदना योजना, बेबी केअर किट, विद्यारंभ प्रमाणपत्र वितरण अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गरोदर मातांसाठी ओटीभरण, अन्नप्राशन कार्यक्रम तसेच पोषण माह २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांचा सत्कार करण्यात आला. बालकांच्या नावाने फळझाडे लावून वृक्षारोपणही करण्यात आले.
खालापूर तालुक्यात सक्षम किट प्राप्त अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन सक्षम किटमधील साहित्य आणि इन्स्टॉलेशनची पाहणी करण्यात आली. सुधागड बालविकास प्रकल्पांतर्गत “Vocal for Local” या संकल्पनेवर आधारित सेविकांनी तयार केलेल्या पाककृती पुस्तिकेचे पगारे यांनी कौतुक केले. तसेच “१००० दिवस बाळाचे” या पुस्तिकेचे वितरण करत बाळांच्या योग्य पालनपोषणासाठी पहिल्या १००० दिवसांचे महत्त्व अधोरेखित केले.
या दौऱ्यात जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक, आदिवासी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, प्रकल्प अधिकारी प्रविण पाटील, तेजस्विता करंगुटकर आणि विशाल कोटागडे उपस्थित होते.
“रायगड जिल्ह्यात पोषण अभियानासह विविध योजनांमध्ये एकात्मिक बाल विकास सेवेचे कार्य नेहमीच उल्लेखनीय राहिले आहे. अंगणवाडी सेविकांनी ‘१००० दिवस बाळाचे’ याबाबत जनजागृती वाढवावी,”
— कैलास पगारे, आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके