परभणी : तळ्यात बुडून आणखी एकाचा बळी; चार दिवसांत तिसरी दुर्दैवी घटना
परभणी, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील कुर्‍हाडी गावातील तलावात पुन्हा एकदा दुर्दैवी घटना घडली आहे. ४० वर्षीय इसमाचा तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, याच तलावात अवघ
कुर्‍हाडी तळ्यात आणखी एकाचा बळी; चार दिवसांत तिसरी दुर्दैवी घटना


परभणी, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील कुर्‍हाडी गावातील तलावात पुन्हा एकदा दुर्दैवी घटना घडली आहे. ४० वर्षीय इसमाचा तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, याच तलावात अवघ्या तीन दिवसांपूर्वी दोन सख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे चार दिवसांत तिसऱ्या मृत्यूमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत इसमाचे नाव सिद्धार्थ सुदाम वाकळे (वय ३५, रा. दहेगाव, ता. जिंतूर) असे असून ते काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सातपुडा येथे मजुरीच्या कामानिमित्त राहत होते. अलीकडेच ते नातेवाईकांच्या लग्नासाठी कुर्‍हाडी येथे आले होते. ते तीन दिवसांपूर्वी बुडालेल्या बहिणींच्या राख सावडण्याच्या कार्यक्रमास उपस्थित होते. सावड कार्यक्रमानंतर ते आपल्या भाऊजींसह तलावाजवळ गेले. त्यावेळी पोहण्यासाठी ते एकटेच तलावात उतरले; मात्र काही वेळातच ते पाण्यात तडफडताना दिसले. त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीने आरडाओरडा करत गावकऱ्यांना मदतीसाठी पाचारण केले. ग्रामस्थांनी तत्काळ तलावात उतरून शोधमोहीम सुरू केली, परंतु दोन तासांच्या प्रयत्नानंतरही काहीच सुगावा लागला नाही.

घटनेची माहिती मिळताच बामणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे, निरीक्षक जोंधळे, बिट जमादार सुभाष चव्हाण यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जिंतूर व परभणी येथील एनडीआरएफ पथकाला पाचारण केले. ग्रामस्थांच्या मदतीने सलग चार ते पाच तासांच्या प्रयत्नानंतर अखेर वाकळे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिंतूर ग्रामीण रुग्णालयात हलवला. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच रुग्णालय परिसरात नातेवाईक व नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मृताच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहून वातावरण हळहळून गेले.

मृताच्या पश्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद बामणी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, केवळ चार दिवसांत कुर्‍हाडी तळ्यातील हा तिसरा बळी असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने तळ्याभोवती सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande