भाजपपुढे इतर पक्षांच्या आघाडीचे आव्हान
पुणे, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। पुरंदर तालुक्यातील जेजुरी नगरपालिका निवडणुकीत नेहमीपेक्षा यावेळी वेगळी निवडणूक असणार आहे. सध्या अनेक समीकरणे बदलली आहेत. यापूर्वी दुय्यम असलेल्या भाजपची माजी आमदार संजय जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे यावेळी ताकद वाढली आहे
भाजपपुढे इतर पक्षांच्या आघाडीचे आव्हान


पुणे, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। पुरंदर तालुक्यातील जेजुरी नगरपालिका निवडणुकीत नेहमीपेक्षा यावेळी वेगळी निवडणूक असणार आहे. सध्या अनेक समीकरणे बदलली आहेत. यापूर्वी दुय्यम असलेल्या भाजपची माजी आमदार संजय जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे यावेळी ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजपचे इतर पक्षांपुढे मोठे आव्हान असणार आहे. भाजपच्या विरोधात इतर पक्ष एकत्र येणार का स्वतंत्र लढणार, यावर बरीच समीकरणे अवलंबून आहेत. सध्या तरी भाजप विरुद्ध इतर पक्षांची आघाडी, अशी चर्चा सुरु आहे. त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जेजुरी नगरपालिकेत आठ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस, अशी लढत झाली होती. त्यावेळी कॉंग्रेसचे नगराध्यक्षासह दहा नगरसेवक, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्याच्यापूर्वी पालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती. मागील काही वर्षांच्या निवडणुकीत बारभाई व सोनवणे व दरेकर या गटांकडे आलटून पालटून नगराध्यक्षपद राहिले असल्याचा इतिहास आहे. परंतु, आता समीकरणे बदलली आहेत. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली जात आहे. पक्षीय समीकरणेही बदलली आहेत.

मागील निवडणुकीत सत्तेत असणारे कॉंग्रेसचे नगरसेवक सध्या भाजपमध्ये आहेत. माजी आमदार संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशानंतर येथील नगरसेवकही त्यांच्याबरोबर भाजपात गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, विरोधक हे सध्या त्याच पक्षात आहेत. विरोधक असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेचे दोन गट झाले असले तरी निवडणूक ते एकत्र येऊ शकतात. भाजपचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे, अशी स्थिती आहे. त्यात शिवसेनेची (शिंदे) भूमिका काय राहणार, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. त्यात मनसे, रिपब्लिकन पक्ष, संभाजी ब्रिगेड यांचीही भूमिका महत्त्वाची आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande