
पुणे, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। शिरूर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. काल पिंपरखेड (ता. शिरूर) येथे रोहन बोंबे या शाळकरी मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांचा संताप उसळला. बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या वीस दिवसांत पिंपरखेड व जांबुत या दोन गावांतील तीन जणांचा जीव गेल्याने परिसरात प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण पसरले आहे.
या पार्श्वभूमीवर आज कवठे येमाई (ता. शिरूर) येथे संतप्त ग्रामस्थांनी अष्टविनायक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सकाळी काही काळ अष्टविनायक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी बिबट्यांना मारण्याची परवानगी द्यावी. तसेच टाकळी हाजी बेट भागातील परिसर बिबटमुक्त करावा. अशी आग्रही मागणी करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु